लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर भाजपाप्रणीत एनडीएला बहुमत मिळालं असलं, तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला आहे. यंदाच्या निवडणुकीत मविआला तब्बल ३० जागांवर यश मिळालं असून महायुती १७ जागांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून त्याची कारणमीमांसा केली जाईल, असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे. आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक निकालांबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी यावेळी लोकसभा निकालांमध्ये महायुतीला कमी जागा मिळाल्या असल्या, तरी मतांचा टक्का मात्र जास्त असल्याचा दावा केला. महाराष्ट्रात भाजपाला यंदा ९ जागा मिळाल्या असून शिंदे गटाला ७ जागा जिंकता आल्या आहेत. अजित पवार गटाला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे महायुतीचा एकूण आकडा १७ पर्यंतच मर्यादित राहिला आहे. भाजपाच्या नेत्यांनी ४५हून जास्त जागा जिंकण्याचा दावा केला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीला ३० जागांवर विजय मिळाला आहे. त्यापैकी काँग्रेसला राज्यात सर्वाधिक १३, शरद पवार गटाला ८ तर उद्धव ठाकरे गटाला ९ जागांवर विजय मिळाला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“इंडी आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त जागा एकट्या भाजपाला मिळाल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला तरीही भाजपा त्यांच्यापेक्षाही मोठी राहिली. एनडीएतील पक्षांसह केंद्रात सरकार स्थापन होतंय”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
“महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. किंबहुना, आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा महाराष्ट्रात आम्हाला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात खरंतर आमची लढाई जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती, तशी काही प्रमाणात अपप्रचाराशीही लढाई करावी लागली. संविधान बदलणार असा अपप्रचार करण्यात आला होता. तो ज्या प्रमाणात थांबवता यायला पाहिजे होता, त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही. जनतेनं जो जनादेश दिला, तो शिरसावंद्य मानून पुढची तयारी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचंही मी अभिनंदन करतो. पण काही गोष्टी आपल्यापुढे मांडल्या गेल्या पाहिजेत. निवडणुकीचं एक गणित असतं. त्यात आम्ही पराजित झालो, असं माझं मत आहे. यात बरीच कारणं असू शकतात. त्यावर आम्ही चर्चा करू”, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी मांडली आकडेवारी
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारी सादर केली. “मविआला मिळालेलं मतदान ४३.९१ टक्के आहे. आम्हाला ४३.६० टक्के मतं मिळाली आहेत. अर्थात अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी फरकाने आम्ही १७ आणि ३० जागा या फरकाने मागे राहिलो आहोत. मविआला २ कोटी ५० लाख मतं मिळाली आहेत. महायुतीला २ कोटी ४८ लाख मतं मिळाली. आमच्यापेक्षा त्यांना फक्त २ लाख मतं जास्त मिळाली आहेत. मुंबईत मविआला ४ आणि आम्हाला २ जागा मिळाल्या. पण मविआला मुंबईत २४ लाख ६२ हजार मतं आहेत तर महायुतीला २६ लाख ६७ हजार मतं आहेत. मुंबईत आम्हाला २ लाख मतं जास्त मिळाली आहेत”, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
“भाजपाचा विचार केला, तर आमच्या ८ जागा अशा आहेत, ज्या ४ टक्क्यांपेक्षा कमी फरकाने आम्ही गमावल्या आहेत. ६ जागा ३० हजारांच्या आत आम्ही गमावल्या आहेत. काही जागा तर २ ते ४ हजार मतांनी आम्ही गमावल्या. याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली. त्यात अगदी थोड्या फरकाने आमच्या जागा कमी झाल्या”, असा दावा फडणवीसांनी केला.
“विरोधकांना अपप्रचाराचा फायदा झाला”
“गेल्या वेळी भाजपाला २७.८४ टक्के मतं होती. त्यावर आम्हाला २३ जागा मिळाल्या. यावेळी २६.१७ टक्के मतं मिळाली. पण आमच्या जागा ९ वर आल्या आहेत. काँग्रेसला १६.४१ टक्के मतं होती. पण त्यांना एकच जागा होती. आता त्यांची मतं झाली १७ टक्के. आणि त्यांच्या जागा झाल्या १३. त्यामुळे भाजपा किंवा एनडीए यांना राज्यात लोकांनी नाकारलं अशी स्थिती नाही. समसमान मतं दिली आहेत. पण अपेक्षेपेक्षा कमी दिली आहेत. त्याचवेळी त्यांच्या बाजूने झालेल्या अपप्रचाराचा त्यांना फायदा झाला”, असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला.
देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पराभवाची कारणं…
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात कमी जागा मिळाल्यामागची कारणं सांगितली. “आम्ही मुद्द्यांचा विचार केला असता काही मुद्दे राज्यभरातले, काही मुद्दे मतदारसंघनिहाय, काही ठिकाणी आमच्या उमेदवारांविरोधातली अँटि इन्कम्बन्सी असे मुद्दे समोर आले. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मुद्दे, कांद्याचा मुद्दा याचा नक्कीच परिणाम झाला आहे. जागतिक बाजारपेठेतल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस याचे भाव कमी झाले. त्याचा फटका बसला. संविधान बदलाचा अपप्रचार, तसेच अल्पसंख्यकांची मतं वेगळ्या अपप्रचारामुळे त्यांच्याकडे गेली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्याप्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतरही अपप्रचार करण्यात आला, त्यावर आम्ही परिणामकारकपणे उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा फटका आम्हाला बसला. विशेषत: मराठवाड्यात हे घडलं. पण त्यासोबतच ध्रुवीकरण झालेली निवडणूक मराठवाड्यात झाली. त्यातूनही आम्हाला अडचणी आल्या”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी भाजपाच्या पराभवाची काही कारणं सांगितली.
“एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी काही समन्वयाच्या मुद्द्यांवरही आम्ही चर्चा करू. हे मुद्दे टाळण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असंही फडणवीसांनी पराभवाची कारणं सांगताना नमूद केलं.