Devendra Fadnavis महाराष्ट्रात महायुतीला महाप्रचंड असं बहुमत मिळालं आहे. २८८ पैकी २३९ जागा भाजपा महायुतीला मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीची धूळधाण उडाली आहे. त्यांचा विरोधी पक्ष नेताही बसणार नाही अशी स्थिती आहे. दरम्यान महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री कोण हा सस्पेन्स अद्याप संपलेला नाही. तरीही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचं नाव निश्चित मानलं जातं आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या बड्या नेत्याने देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचं कौतुक केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाना पटोले हटाओ अशी काही मोहीम वगैरे सुरु नाही
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाना पटोले हटाओ अशी कुठली मोहीम सुरु नाही. आम्ही काही त्या मोहिमेत नाही. मी कुठलीही मोहीम करुन हे काही राबवण्याची आवश्यकता नाही. काही गोष्टी चुकल्या आहेत हे मान्य नाही. अशी कुठली मोहीम सुरु असेल तर मी त्या मोहिमेचा भागीदार नाही. मात्र एवढा मोठा पराभव झाल्यानंतर मंथन होण्याची गरज आहे. केवळ बैठका घेऊन काही निष्पन्न होईल असं नाही असंही वडेट्टीवार म्हणाले.
हे पण वाचा- Devendra Fadnavis : समंदर लौटकर आ गया! देवेंद्र फडणवीस… राजकीय चक्रव्यूहात न अडकलेला अभिमन्यू !
एकनाथ शिंदेंचा चेहरा पडणं ही स्वाभाविक बाब
एकनाथ शिंदेंचा चेहरा पडला होता ही स्वाभाविक बाब आहे. कारण सत्ता मिळूनही त्यांना सर्वोच्च खुर्ची मिळालेली नाही. मला वाटतं आहे की २०२९ मध्ये हे दोन उपमुख्यमंत्रीपदाचे चेहे आहेत म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपल्यात जमा आहे. मोदी आणि शाह यांच्या आशीर्वादानेच त्यांना सत्तेत राहता येईल. अन्यथा ते काहीही करु शकणार नाहीत. हे दोघं विरोध करु शकत नाहीत. तसंच पद मिळालं नाही म्हणून तक्रार करु शकत नाहीत. एकनाथ शिंदेंना पक्ष सांभाळायचा असेल तर उपमुख्यमंत्रिपदही घ्यावं लागेल. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनीही ते पद घेतलं होतंच. असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसंच विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचं कौतुक केलं आहे.
देवेंद्र फडणवीस लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून काम करतील
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत याचा विदर्भाच्या दृष्टीने आनंद आहे. विदर्भाचा बॅकलॉग देवेंद्र फडणवीस भरुन काढतील. देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही. उलट कुबड्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर विसंबून आहेत. आता त्यांना फ्री हँड करण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेक म्हणून विदर्भाचे प्रश्न देवेंद्र फडणवीस सोडवतील, विदर्भाला न्याय देतील अशी अपेक्षा ठेवू. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुसरी अपेक्षा आहे की ते बदल्याचं किंवा सुडाचं राजकारण करणार नाहीत. मुख्यमंत्री झाल्यावर ते तसं वागणार नाहीत असं आम्हाला वाटतं आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसंच ते लोकप्रिय मुख्यमंत्री होती अशी अपेक्षा आपण आत्ता तरी ठेवायला हरकत नाही असंही विजय वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.