शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे रंगतदार झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आता भाजपाला मोठा विजय मिळणार असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. पूर्ण बहुमत नसलं, तरी सत्तास्थापनेसाठी दावा करण्याइतपत यश भाजपाच्या पारड्यात मतदारांनी टाकलं आहे. या पार्श्वभूमीवर गोवा आणि उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है अशी विधानं महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून केली जात आहेत. यासंदर्भात विजयानंतर प्रतिक्रिया देताना राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे.
आदित्य ठाकरे, राऊतांच्या सभेचं काय झालं?
गोव्यात आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी सेना-राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मोठी सभा घेतली होती. त्यानंतर देखील या युतीला गोव्यात खातं उघडता आलं नसल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी खोचक टोला लगावला आहे.”आदित्य ठाकरेंनी, संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात खूप मोठी सभा घेतली होती. आमचे मुख्यमंत्री पडणार असं देखील म्हटलं होतं. पण प्रमोद सावंतांच्या विरोधातील त्यांच्या उमेदवाराला फक्त ९७ मतं मिळाली आहेत”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातही सत्ताबदल?
दरम्यान, भाजपाच्या नेतेमंडळींनी केलेल्या गोवा-यूपी झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है अशा विधानांमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “या विजयानंतर भाजपावर महाराष्ट्रात विश्वास वृद्धिंगत होईल. कार्यकर्त्यांचं नीतीधैर्य वाढत असतं. जनतेच्याही नीतीधैर्यात फरक पडेल. पण भाजपाला पूर्णपणे निवडून आणण्यासाठी २०२४ची तयारी आमची सुरू आहे. दरम्यानच्या काळात सरकार पडलं, तर आम्ही आमचं सरकार बनवू. लोकांच्या मनात अशा विजयांमुळे एक प्रकारची सकारात्मकता तयार होते”, असं फडणवीस म्हणाले.
“…तर गोव्यात चित्र वेगळं दिसलं असतं”, राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवारांची पहिली प्रतिक्रिया!
काँग्रेसवर निशाणा!
“गोव्यात सर्वाधिक खर्च करणाऱ्या पक्षात पहिलं नाव काँग्रेसचं आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातून बॅगा भरून पैसे घेऊन लोक सरकार बनवण्यासाठी आले होते. पण लोकांनी भाजपावर विश्वास दाखवला आहे. संपूर्ण गोव्यात लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे. उत्तर गोव्यात ११ तर दक्षिण गोव्यात ९ जागा मिळाल्या”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.