Devendra Fadnavis : “शेतकऱ्यांना ३६५ दिवस मोफत वीज मिळणार”, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली योजना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना वीज माफी कशी मिळणार ते सांगितलं आहे.

DCM Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (फोटो-फेसबुक पेज)

आज महायुतीने पत्रकार परिषद घेऊन त्यांचं रिपोर्टकार्ड सादर केलं. एवढंच नाही तर आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, खुर्ची हे आमचं लक्ष्य नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी शंखनाद या एका शब्दाने एक्स पोस्ट केली होती. राज्यात निवडणुकींचा शंखनाद झालाय, असं त्यांना म्हणायचं होतं. आजही महायुतीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “निवडणुकीचा शंखनाद झालाय. अर्थात आमच्याकरता शंखनाद झाला आहे असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, “विरोधक एकीकडे म्हणत आहेत की राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि वर घोषणा करतात की त्यांचं सरकार आल्यावर ते संपूर्ण कर्जमाफी करणार आणि इतरही अनेक घोषणा करत आहेत. त्यामुळे विरोधकांनी आधी ठरवावं की सरकारकडे योजनांसाठी पैसे आहेत की नाहीत? पैसे असतील तर ते पुढची कर्जमाफी करू शकतील. मात्र, आम्ही ज्या योजना आतार्यंत सांगितल्या आहेत, त्या पूर्ण विचार करून जाहीर केल्या आहेत. त्या योजना यापुढेही चालू राहतील. प्रत्येक योजनेच्या पाठिशी पूर्ण आर्थिक पाठबळ उभं करूनच आम्ही योजना जाहीर करू. मात्र विरोधक गोंधळले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद करावी असं त्यांना वाटतं. परंतु, मला एक गोष्ट सर्वांना सांगायची आहे की या निमित्ताने महाविकास आघाीचा पर्दाफाश झाला आहे, तसंच लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी असणार आहे असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी जाहीर केलंं.”

शेतकऱ्यांना ३६५ दिवस वीज कशी देणार? देवेंद्र फडणवीस यांनी थेट सांगितलं

“महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. शेती वीजेसाठी स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली. १४ हजार मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू केलं. येत्या १५ ते १८ महिन्यात पूर्ण काम होईल. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना ३६५ दिवस वीज देऊ. ही घोषणा नाही. प्रत्यक्ष काम सुरू केलं आहे. आता साडे आठ रुपयाची वीज तीन रुपयांना पडणार आहे. १० हजार कोटी बजेट आणि पाच हजार कोटी क्रॉस सबसिडीचे आम्ही वाचवणार आहोत. त्याआधारे शेतकऱ्यांना मोफत वीजेची योजना आहे. प्रिंटिंग मिस्टेक घोषणा नाही. हा वेल थॉट म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेतलाय. अनेक वर्ष तो चालणार आहे. विजेच्या बाबतीत शेतकऱ्यांना चिंता मुक्त करण्याचं काम आपण केलंय. ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना आव्हान, “महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा..”

सिंचनाच्या क्षेत्रातही महाराष्ट्राचं अभूतपूर्व काम

“सिंचनाच्या क्षेत्रातही या सरकारने अभूतपूर्व काम केलं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली नाही. १४५ प्रकल्पांना ही मान्यता दिली आहे. दुष्काळी भागात ही प्रकल्प मान्य केले आहेत. अनेक दुष्काळी भागातील कामे सुरूवात झाली आहे. सर्वात महत्त्वाचं नदी जोड प्रकल्प ९० हजार कोटीचा नारपार प्रकल्प केला. पश्चिमी वाहिन्यातून वाहून जाणारे ५५ टीएमसी पाणी वाचवलं. मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी ही योजना आणण्यात आली. कोणतीही योजना कागदावर नाही. सर्व गोष्टींचं टेंडर निघालं. अनुसंधान सुरू आहे. सिंचन क्षेत्रात मोठं काम सुरू आहे” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis on free electricity to farmers what did he say about report card before maharashtra assembly election scj

First published on: 16-10-2024 at 16:30 IST
Show comments