कराड: ज्या देशाचा नेता सक्षम, कणखर असतो तो आणि तो देशच प्रगतीपथावर राहतो. तरी छत्रपती शिवाजीमहाराजांना प्रेरणास्थानी ठेवून कार्यरत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाच्या उज्वल भवितव्यासाठी तिसऱ्यांदा महायुतीच्या माध्यमातून निवडून द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभेच्या सातारा मतदारसंघातील ‘महायुती’चे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटण येथे जाहिर सभेत ते बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, रविराज देसाई, नरेंद्र पाटील, ॲड.भरत पाटील, विक्रमबाबा पाटणकर, मच्छिंद्र सकटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चौफेर प्रगतीसाठी पुन्हा सत्ता द्या

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान  मोदींनी देशातला भ्रष्टाचार संपवला. सजिॅकल स्ट्राईक करून पाकीस्तानला कायमचा धडा शिकवला. त्यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजीमहाराज आहेत. त्यांनी देशाची गतिमान चौफेर प्रगती साधली आहे. तरी हा विकासरथ असाच गतिमान राहण्यासाठी अन् राष्ट्राच्या भवितव्यासाठी केंद्रात पुन्हा म्हणजेच तिसऱ्यांदा सत्तेवर येणे गरजेचे असल्याने साताऱ्यातून ‘महायुती’चे उमेदवार, छत्रपती शिवाजीमहराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना भरघोस मताधिक्याने निवडून देऊन आशिर्वाद द्या, असेही आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

हेही वाचा >>> कर दहशतवाद नष्ट करणार, महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरेंची घोषणा

शंभूराजेंच्या मागण्या पूर्ण करु

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पद्म पुरस्कार देण्यासाठी मी केंद्राकडे मागणी करणार आहे. देसाई घराण्याच्या चार पिढ्यांवर जनतेने प्रेम केले. देसाईंच्या मागणीनुसार तालुक्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्पासाठी भरघोस निधी देऊ. जिल्ह्यातील प्रकल्पांना नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर भरघोस निधी दिला आहे. शंभूराज देसाई यांनी जी कामे मागितली, ती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

उदयनराजेंना मोठे मताधिक्य देऊ

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, गेल्या दहा वर्षांत देशाने मोदींचे नेतृत्व स्वीकारले. विकासाची दृष्टी असलेल्या मोदींना पुन्हा निवडणूकीत निवडून दिले पाहिजे. महायुतीने चारशेपारचा नारा दिला असून त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे असतील. सातारा मतदारसंघात आम्ही ‘महायुती’चे चार आमदार आहोत. आम्हाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आवश्यक सुचना केल्या आहेत.

कमळ, धनुष्यबाणाचा पैरा ठरला

पाटण विधानसभा मतदारसंघात लोकसभेला कमळावर आणि विधानसभेला धनुष्यबाणावर मतदान करायचे, असा पैरा करायचे ठरले आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना मोठे मताधिक्य देऊ, अशी ग्वाही शंभूराजांनी दिली. पाटण तालुक्यातील निवकणे, चिटेघर, बिबी धरणाची कामे अर्धवट आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत. यामुळे हा परिसर हिरवागार होईल. यासाठी आपण निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर; म्हणाले, “आजारपणात माझी चौकशी करता अन् तुमचे पाव उपमुख्यमंत्री…”

लोकनेत्यांना ‘पदमश्री’ द्यावा

पाटण तालुक्यातील जनतेचा आणि देसाई घराण्याचा चार पिढ्यांचा सबंध आहे. देसाई घराण्याने मोठा संघर्ष केला आहे. मला २१ वर्ष आमदारकीची वाट पाहावी लागली.  लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मरणोत्तर पदमश्री पुरस्कार द्यावा, यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. त्यास तात्काळ मंजूरी देऊन लोकनेत्यांना मरणोत्तर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी विनंती मंत्री देसाई यांनी यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

भाजपने गरजांची पूर्तता केली

उदयनराजे भोसले म्हणाले, हा परिसर सुंदर आहे. मात्र, व्यथाही तेवढ्याच आहेत. येथील अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे येथे आहेत. या भागाचे नंदनवन करायचे असेल, तर मोठ्या प्रमाणावर भविष्यकाळात ॲग्रो टुरिझमसारखे प्रकल्प राबवणार आहोत. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. दहा वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहेत. याअगोदर विरोधकांनी खोटे नारे देऊन अनेक वर्षे सत्ता भोगली. लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत. यामुळे उद्रेक होऊन सत्ता परिवर्तन झाले. भाजप व महायुती सरकारने जनतेच्या गरजांची पूर्तता केली आहे. तरी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन उदयनराजे यांनी केले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis public meeting in patan for mahayuti candidate udayanraje bhosale zws