Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालांवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विरोधकांना टोले लगावले आहेत. कर्नाटकातील निवडणूक निकालांमुळे महाराष्ट्रातील काही नेत्यांचा आनंद म्हणजे, ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी अवस्था असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“कर्नाटकमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. एखादा अपवाद वगळला, तर १९८५ पासून कुठलेही सत्तेतील सरकार पुन्हा जनतेने निवडून दिले नाही. सरकार सतत बदलत असते. यावेळी ही मालिका खंडित करण्याची आम्हाला शाश्वती होती. पण, तसे झाले नाही. २०१८ साली भाजपाच्या १०६ जागा निवडून येत ३६ टक्के मत मिळाली होती. आता भाजपाला ३५.६ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे ०.४ टक्के मते भाजपाची कमी झाली आहेत. तसेच, ४० जागाही कमी झाल्यात,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
हेही वाचा : कर्नाटकात भाजपाची पिछेहाट, ठाकरे गटाच्या खासदाराने ट्वीट करत डिवचलं; म्हणाल्या, “हनुमानाने सुद्धा…”
“माझं निपाणीच्या लोकांनी ऐकलं आणि शरद पवारांचा उमेदवार…”
‘मोदी है तो मुमकिन है, लोकांना अमान्य,’ असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या निवडणुकीवर व्यक्त केलं. याबद्दल विचारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवारांनी कर्नाटकात जागा लढवल्या. पण, तिथे त्यांना एक टक्केही मते मिळाली नाहीत. ०.५ टक्क्यांच्याही खाली मते राष्ट्रवादीला मिळाली आहेत. मी सांगितलं होतं, यांचा उमेदवार ‘पॅक’ करून परत पाठवा. माझं निपाणीच्या लोकांनी ऐकलं आणि शरद पवारांचा उमेदवार ‘पॅक’ करून परत पाठवला आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काय महत्वं द्यायचं,” असा टोमणा फडणवीसांनी पवारांना लगावला आहे.
“कर्नाटकाचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचं सांगत आहेत, त्यात…”
“काही लोकांना असं वाटत आहे, जवळपास ते देशच जिंकले आहेत. त्यांना एवढाच सल्ला आहे, की पूर्वीचे विधानसभा आणि नंतर लोकसभेचे निकाल पाहिजे पाहिजेत. आजच उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल समोर आले आहेत. याठिकाणी भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे कर्नाटकाचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचं सांगत आहेत, त्यात कोणताही अर्थ नाही,” असेही फडणवीसांनी सांगितलं.
हेही वाचा : निकाल कर्नाटकचा, घडामोडी महाराष्ट्रात; शरद पवारांची पुढची रणनीती तयार? पत्रकार परिषदेत म्हणाले, “मी स्वत:…!”
“महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं सरकार येणार”
“कर्नाटकातील निवडणुकीचा कोणताही परिणाम देश आणि महाराष्ट्रातही होणार नाही. देशात मोदींचं आणि महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं सरकार येणार आहे,” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.