देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. या पाच राज्यांमधील स्थानिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्षांनी गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार प्रचार केला. भारतीय जनता पार्टीदेखील या बाबतीत मागे राहिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्र सरकारमधील अनेक मंत्री, भाजपाशासित वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या पाचही राज्यांमध्ये भाजपा उमेदवारांचा प्रचार केला. भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेशात भाजपाचा प्रचार केला. दरम्यान, मंगळवारी (१४ नोव्हेंबर) त्यांनी पांढुर्णा येथे सभा घेतली. या सभेत बोलताना फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली.
पांढुर्ण्यातील सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “निवडणूक आली की काँग्रेस नेते मंदिरात जातात आणि निवडणूक संपली की बँकॉकला जातात. हेच नेते श्री राम आणि रामसेतू दोन्हींवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.” मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बुधवारी (१५ नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. या दिवशी फडणवीस यांनी सौंसर आणि पांढुर्णा येथे सभा घेतल्या. सौंसर आणि पांढुर्णा या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनुक्रमे नानाभाऊ मोहोड आणि प्रकाशभाऊ उईके यांच्या प्रचारार्थ फडणवीस यांनी सभा घेतल्या. मध्य प्रदेशचा हा त्यांचा तिसरा प्रचार दौरा होता, यापूर्वी त्यांनी १८ सप्टेंबर आणि १० नोव्हेंबर रोजी प्रचारात भाग घेतला होता. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, माजी मंत्री परिणय फुके, आमदार प्रवीण दटके यावेळी उपस्थित होते.
काँग्रेस नेत्यांवर टीका करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही तीच मंडळी आहेत, जे सनातनला डेंग्यू, मलेरिया म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात तोडणारे हेच कमलनाथ आहेत. कमलनाथ हे देशाच्या बाजूने आहेत की औरंगजेबाच्या बाजूने हा प्रश्न निर्माण होतो. शिवरायांचा पुतळा पाडणारे कधीच पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्याच ठिकाणी शिवरायांचा पुतळा उभा केला.
हे ही वाचा >> शरद पवार-अजित पवारांच्या गाठीभेटी, राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण? मंत्री संजय बनसोडे म्हणाले…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनजाती गौरव दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४,००० कोटींची पीएम जनमन योजना सुरू केली आहे. यापूर्वी ११,००० कोटींची विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारे मोदी आहेत. त्यामुळेच आजवरचा सर्वांत मोठा गरिब कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबवला आहे.