Devendra Fadnavis on Maharashtra Assembly Election 2024 Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात वातावरण तापलं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मतदानोत्तर चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात अटीतटीची स्पर्धा होईल. तर काही चाचण्यांमधून त्रिशंकू स्थितीचा अंदाज वर्तवला होता. तीन चाचण्यांनी मविआच्या बाजूने कल दर्शवला होता. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्या चुकीच्या ठरवत महायुतीने तब्बल २३५ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. रात्री आठ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार २८८ पैकी २३६ जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर आघाडी मिळाली आहे. महायुतीमध्ये भाजपाला १३७, शिवसेनेला (शिंदे) ५८, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १५ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १४ जागा जिंकल्या आहेत.
अशा प्रकारचा निकाल कोणालाही अपेक्षित नव्हता. भाजपा नेत्यांनी देखील १६० ते १७५ जागा मिळतील असाच अंदाज व्यक्त केला होता. मात्र महायुतीला २३५ हून अधिक जागा मिळाल्याने भाजपा व महायुतीतील नेत्यांना देखील आश्चर्य वाटलं आहे. भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीसांना आश्चर्य
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेने, तसेच विदर्भासह नागपूरच्या जनतेने आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिला आहे. तसेच जे लोक सांगत होते की विदर्भात आमचं पानिपत होईल, आमचं विदर्भात किंवा नागपुरात पानिपत होईल त्यांचंच विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पानिपत झालं आहे. राज्याच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे मी राज्याच्या जनतेसह नागपूर व विदर्भाच्या जनतेचे, माझ्या कर्मभूमीचे आभार मानतो.
दरम्यान, यावेळी त्यांना विचारण्यात आलं की भाजपाला १३७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता भाजपाचा, नागपूरचा मुख्यमंत्री होणार का? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील. हा निकाल खरोखरंच अविश्वसनीय, अभूतपूर्व असा निकाल आहे. ईश्वर व जनता जेव्हा आपल्याला काहीतरी देते तेव्हा भरभरून देते. जनतेने आम्हाला छप्परफाड मतदान केलं आहे”.