Devendra Fadnavis : “हम साथ साथ हैं म्हणणारे आता हम तुम्हारे हैं कौन? विचारत आहेत”, फडणवीसांचा मविआला टोला

हरियाणातील निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका

DCM Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (फोटो-फेसबुक पेज)

हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांचे निकाल मंगळवारी लागले आहेत. हरियाणात भाजपाचा पराभव होईल अशी चर्चा होती. एग्झिट पोल्सचे अंदाजही तसेच होते. मात्र सगळे अंदाज चुकवत भाजपाने हरियाणामध्ये विजय मिळवला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका , त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनीही सकाळच्या भोंग्याला आता कसं वाटतंय विचारत टोला लगावला होता. आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये आहेत. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हम तुम्हारे हैं कोन अशी महाविकासची अवस्था

हरियाणाचे निकाल लागल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणे सांगतो. काँग्रेस, शरद पवार यांचा गट आणि उबाठा सेना हे त्यांची शस्त्र चमकवून बसले होते. हरियाणात भाजपा हरली की आम्ही त्यांच्यावर हल्ला करतो. पण ती संधी त्यांना मिळाली नाही. देशाचा मूड काय आहे तो त्यांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे कालपर्यंत आम्ही एकत्र आहोत म्हणणारे, हम साथ साथ है! म्हणणारे हम तुम्हारे हैं कौन असं विचारु लागले आहेत. हे तुम्हाला सगळ्यांना पाहण्यास मिळतं आहे. सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की या निवडणुकीने फेक नरेटिव्ह तोडून दाखवला. लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता. फेक नरेटिव्ह लोकांच्या लक्षात आला आणि लोक भाजपाच्या पाठिशी आहेत.

हे पण वाचा- ‘लाडकी बहीण’सह सर्व योजना सत्ता आल्यास सुरू राहणार; देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची ग्वाही

ओबीसी समाजासाठी हॉस्टेल्स सुरु केली आहेत

मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की मी ज्यावेळी अर्थमंत्री होतो त्यावेळी आठ नवी मेडिकल कॉलेज आम्ही घोषणा केली होती. त्यातले पाच कॉलेजेस विदर्भातले आहेत. त्यातल्या पाच कॉलेजेसची सुरुवात होते आहे. यामुळे मेडिकल इंटेकमध्ये वाढ होणार आहे. याचा फायदा मेडिकल करु पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच नागपूरचं विमानतळ हे अत्याधुनिक होतं आहे. त्याचा मला आनंद आहे. शिर्डीतही विमानतळ मोठं करण्याचा आमचा मानस होता त्यामुळे ते देखील आम्ही तयार करत आहोत. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

जागावाटपाबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

जागावाटपाची चर्चा अगदी अंतिम टप्प्यात आहे. आमचा ८० टक्के पेपर सोडवून झाला आहे, उरलेला २० टक्के पेपर सोडवला की आम्ही तुम्हाला त्याची माहिती देऊ. मी मुख्यमंत्री असताना घोषणा केली होती की ओबीसींसाठी ३६ हॉस्टेल तयार करु. आमच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यांनी ७२ हॉस्टेल बांधू अशी घोषणा केली होती. पण एकाचंही काम सुरु केलं नाही. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता याचं काम सुरु झालं आहे, आम्ही ५२ हॉस्टेलचं उद्घाटन करतो आहोत. ज्या ठिकाणी हॉस्टेल नाही त्यासाठी रहिवासी आणि खाण्यापिण्यासाठी भत्ता देत आहोत. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis slams opposition parties after haryana result what did he says scj

First published on: 09-10-2024 at 12:42 IST
Show comments