लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या आधीची रणधुमाळी चर्चेत आहे. रोज सभा आणि रॅली निघत आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांनी मोदी उद्धव ठाकरेंना फोन करुन त्यांची चौकशी करायचे असं सांगितलं आहे. उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा फोन करुन ते चौकशी करायचे असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देशात पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होतील हा निर्णय लोकांनी घेतला आहे. चंदगडच्या सभेत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. संजय मंडलिक यांना लोक निवडून देतील हा मला विश्वास आहे.
शरद पवारांना टोला
देशासमोरचं संकट मोदी नाहीत. मात्र शरद पवारांसमोरचं सर्वात मोठं संकट मोदी आहेत. कारण मोदी आल्यानंतर त्यांच्या पक्षाची जी अवस्था झाली ती सगळ्यांना माहीत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याच बरोबर आहे. त्यामुळे मला जे वाटतं की शरद पवारांसाठी मोदी हे संकट असू शकतात. बाकी देशाची जनता तर मोदींवर प्रेम करते. मला वाटतं की जनता शरद पवारांना याचं उत्तर मतपेटीतून देईल.
हे पण वाचा- नाना पटोलेंचं वक्तव्य, “देवेंद्र फडणवीस मटण खाणारे ब्राह्मण, त्यांचा शाप..”
होय, पंतप्रधान उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत असं सांगितलं की उद्धव ठाकरे आजारी असताना रश्मी ठाकरे यांना फोन करुन मी त्यांची विचारपूस करायचो असं सांगितलं. तसंच अजून जरी त्यांनी मदत मागितली तर मी मदत करायला तयार आहे असंही मोदी म्हणाले होते. यावर विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे सत्य आहे. राजकारणात पक्ष वेगळे असू शकतात, अडचणींच्या काळात विचारपूस करणं, चौकशी करणं ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. मोदी ती संस्कृती पाळतात. मला पूर्ण कल्पना आहे की त्या काळात मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करत असत.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे जेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या मानेवर जी शस्त्रक्रिया झाली त्यामुळे त्यांना हालचाल करता येणंही शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना घराबाहेरही पडता येत नव्हतं. तसंच त्यांना आराम करावा लागत होता. शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीतही उद्धव ठाकरेंच्या शस्त्रक्रियेचा उल्लेख आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीतही त्यांची अवस्था कशी झाली होती ते सांगितलं होतं. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रश्मी ठाकरेंना फोन करुन त्यांची विचारपूस करायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली.