महाराष्ट्रातलं राजकारण २०१९ ते २०२४ या कालावधीत चांगलंच ढवळून निघालं आहे. लोकसभा निवडणूक सुरु आहे. अशात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार ते महायुतीचं सरकार असे दोन टप्पेही पाहिले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले. यामागचं कारण काय? ते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात सरकार पाडण्याची सुरुवात कुणी केली?

“महाराष्ट्रात सरकार पाडण्याची सुरुवात कुणी केली? वसंतदादा पाटील यांच्याच सरकारमध्ये राहून त्यांचंच सरकार पाडण्याचं काम कुणी केलं? ज्यावेळी हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते त्यावेळी त्यांचा पक्ष फोडून त्यांना दुःख देण्याचं काम कुणी केलं? हे सगळ्यांना स्पष्टपणे माहीत आहे. खोके, ओके, तोडले-फोडले या घोषणांचा काही परिणाम होणार नाही. दोन पक्ष विभाजित झालेले दिसतात याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे अहंकार आणि अतिमहत्वकांक्षा”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “मी नागपुरी आहे, त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंना अहंकार

“उद्धव ठाकरेंना अहंकार होताच. ते आमच्याबरोबर होते तेव्हाही रोज मोदींवर शेलक्या शब्दांत बोलायचं, लिहायचं हे त्यांनी केलं. कारण तो त्यांचा अहंकार होता. तसंच मुख्यमंत्रिपदाची लालसा होती. खरंच शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं असतं तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करु शकत होते. शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. संधी मिळाली तशी त्यांनी विचारांन तिलांजली दिली. बाळासाहेब ठाकरेंचे विचार बासनात गुंडाळले आणि सरकार स्थापन केलं. हीच त्यांची अति महत्वकांक्षा पक्ष विभाजित होण्यासाठी कारणीभूत ठरली. कारण माझ्यानंतर माझा मुलगा अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात आला. मुलासाठी अडसर कोण कारण एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे आमदारांमध्ये प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली. त्यांच्या मंत्रालयात त्यांना न बोलवता आदित्य ठाकरे बैठका घेऊ लागले होते. त्यांच्याबरोबरच्या आमदारांना धमक्या देण्यात आल्या. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंना हे समजलं की विचारांशी प्रतारणा झाली, दुसरीकडे आपल्याला संपवण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे शिवसेनेचं विभाजन झालं.”

हे पण वाचा- देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, “बारामतीत जिंकणार तर…”

शरद पवारांनी अजित पवारांना व्हिलन केलं

“शरद पवार यांनी तीनवेळा आमच्याशी चर्चा केली. त्यावेळी अजित पवार यांना पुढे केलं. आमच्याशी युती त्यांनी करण्याच्याच त्या चर्चा होत्या. निर्णय झाला होता तरीही मागे हटले. अजित पवारांना शरद पवारांनी व्हिलन ठरवलं. कारण त्यांना पक्ष सुप्रिया सुळेंच्या हातात द्यायचा होता. अजित पवार लोकांमध्ये प्रसिद्ध होते, पण अडसर ठरत होते. महाराष्ट्राची माहिती अजित पवारांना जास्त आहे. अजित पवारांना व्हिलन करत नाही तोपर्यंत सुप्रिया सुळेंना हिरो करता येणार नाही असं राजकारण शरद पवारांनी केलं. त्यामुळे अजित पवार आमच्या बरोबर आले. महाराष्ट्रातल्या जनतेने हा इतिहास पाहिला आहे. यामुळेच या दोन पक्षांचं विभाजन झालं.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पक्ष असेच फुटतात का?

“शरद पवारांना कन्याप्रेम आणि उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम महागात पडलं हे १०० टक्के. कारण सरळ आहे असेच पक्ष फुटतात का? कुणी ठरवलं तरीही पक्ष असे फुटतात का? सत्तेततून लोक विरोधी पक्षाकडे गेले असं पाहिलंय का कधी? असं नाही होत. भाजपाने स्क्रिप्ट लिहिलं वगैरे काहीही नाही. एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आले त्यांच्याविरोधात ईडीची चौकशीचा एक कागद दाखवा? नाहीच. ते सत्तेत नगरविकास मंत्री होते. तरीही ते आमच्यासह आले. सत्ता सोडून आले.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुढारी या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ही सगळी भूमिका मांडली आहे.

उद्धव ठाकरेंची निराशा बाहेर पडते आहे

“एक काळ असा होता की हिंदी सिनेमात सलीम-जावेद लिहिलेला सिनेमा सुपरहिट व्हायचा. आत्ताचे काही नवीन सलीम-जावेद आहेत. फक्त हे फ्लॉप आहेत. कारण रोज नव्या स्टोरी तयार करतात. पाच वर्षांनी उद्धव ठाकरेंना हे आठवतं आहे की मी आदित्यला मुख्यमंत्री करणार होतो? पाच वर्षे अमित शाह यांचं नाव घेतलं आता माझं नाव घेत आहेत. खरं बोलायला विचार करावा लागत नाही. खोटं बोललं की भांडाफोड होतोच. आता उद्धव ठाकरेंना सुचत नाही की काल आपण वेगळं बोललो, आज वेगळं बोललो. आता ते शिवीगाळ करु लागले आहेत, शिवराळ भाषा वापरत आहेत. एका पक्षाचा नेता जी भाषा वापरतो आहे ते त्यांना शोभतं का? पण उद्धव ठाकरेंची ही सगळी निराशा आहे जी आता बाहेर पडते आहे.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis told reasons about ncp and shivsena split he also comment on sharad pawar and uddhav thackeray scj
Show comments