छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, ४ नोव्हेंबरला दुर्ग येथील सभेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांनी बघेल सरकावर टीकास्त्र डागलं आहे. भ्रष्टाचाराच्या पैशातून तिजोरी भरणं हे काँग्रेसचं काम आहे, अशी टीका मोदींनी केली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “छत्तीसगडची निर्मिती भाजपानं केली आहे. भाजपाच छत्तीसगडचा विकास करेल. पण, भ्रष्टाचारातून तिजोरी भरण्याला काँग्रेसचं प्राधान्य आहे. काँग्रेसचे सरकार तुम्हाला लुटण्याची एकही संधी सोडत नाही. यांनी ‘महादेव’ नावंही सोडलं नाही. दोन दिवसांपूर्वी रायपूरमध्ये पैशांचा मोठा साठा आढळला आहे. हे पैसे जुगार खेळणारे आणि सट्टेबाजांचे असल्याचं लोक म्हणतात.
हेही वाचा : “भाजपा स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाही, म्हणून…”, भूपेश बघेल यांची टीका
“या पैशांतून काँग्रेसचे नेते आपलं घर भरत आहेत. दुबईत बसलेल्या लोकांशी यांचा काय संबंध आहे? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी छत्तीसगडच्या जनतेला द्यावं. काँग्रेस मोदींना रात्रंदिवस शिव्या घालतात. आता छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांनाही शिव्या देण्यास सुरूवात केली आहे. पण, मोदी शिव्यांना घाबरत नाही. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जनतेनं मला दिल्लीला पाठवलं आहे,” असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
“छत्तीसगड लुटणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यांच्याकडून प्रत्येक पैशांचा हिशोब जाणार आहे. छत्तीसगडच्या भ्रष्ट सरकारनं एकामागून एक घोटाळे केले आहेत. राज्यात पुन्हा भाजपाचं सरकार आल्यानंतर घोटाळेबाजांची चौकशी करून तुरूंगात पाठवणार,” असा इशारा पंतप्रधानांनी दिला आहे.
हेही वाचा : युवक, महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न; छत्तीसगडमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस उरले आहेत. अशातच ‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी केला. तसेच हे प्रकरण चौकशीच्या कक्षेत येत असल्याचे सांगितले. यावरूनच पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि मुख्यमंत्री बघेल यांना लक्ष्य केलं.