समीर जावळे
‘काका मला वाचवा!’ अशी आरोळी नारायण रावांनी दिली आणि राघोबादादांनी गारदी पाठवून त्यांची हत्या घडवली. आनंदीबाईंनी ‘ध’ चा ‘मा’ केला. राघोबादादांना पेशवे पदावर बसायचं होतं म्हणून त्यांनी हे सगळं घडवून आणलं हा इतिहास आपण असंख्य वेळा ऐकला आहे. महाराष्ट्राला फक्त या पेशवाईतल्या काका पुतण्यांचा इतिहास नाही. तर पुतण्या काकांसाठी व्हिलन ठरलाय याची अनेक राजकीय उदाहरणं आहेत. या उदाहरणांमध्ये आत्ता चर्चेत असलेले काका-पुतणे आहेत ते म्हणजे शरद पवार आणि अजित पवार.
अजित पवारांचं पहिलं बंड आणि पहाटेचा शपथविधी
अजित पवारांनी २०१९ मध्ये विधानसभेच्या निकालानंतर अचानक एक दिवस देवेंद्र फडणवीसांसह शपथविधी केला आणि महाराष्ट्रात राजकीय धुरळा उडवून दिला. मात्र अजित पवारांसह गेलेल्या सगळ्या आमदारांना माघारी आणण्यात शरद पवार १०० टक्के यशस्वी झाले आणि फडणवीस-पवार सरकार अवघ्या ७२ तासांत कोसळलं. या पहाटेच्या शपथविधीबाबत पुढे अनेक चर्चा झाल्या. पण शरद पवारांना अंधारात ठेवून हे सगळं घडलं होतं यावर तेव्हाही कुणाचा विश्वास बसला नव्हता आणि अजूनही बसलेला नाही. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, शरद पवार या तिघांनीही या पहाटेच्या शपथविधीचे तीन पैलू जगासमोर आणले आणि सत्य सगळ्यांनाच कळलं आहे. २०२३ मध्ये अजित पवारांनी मात्र दुसरा प्रयत्न केला आणि थेट आपल्या जाणत्या काकांनाच आव्हान दिलं.
२०२३ चं अजित पवारांचं बंड पूर्ण यशस्वी
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड २०२२ मध्ये पुकारलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि ते सरकार कोसळलं. सरकार कोसळल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या घटनेला एक वर्ष आणि दोन दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली. शरद पवार गट वेगळा झाला आणि अजित पवार गट वेगळा झाला. अजित पवारांना पक्षाचं नाव, घड्याळ चिन्ह या सगळ्या गोष्टी मिळाल्या.
तुमच्या पोटी जन्माला आलो नाही ही काय चूक?
“नवी पिढी पुढे येते आहे, तु्म्ही आशीर्वाद द्या. चुकलं तर सांगा अजित तुझं चुकलं. चूक मान्य करुन, दुरुस्त करुन पुढे जाऊ. पण हे कुणासाठी चाललं आहे? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? वय ८२ झालं, ८३ झालं तुम्ही थांबणार आहात का?” ५ जुलै २०२३ च्या सभेतले हे उद्विग्न उद्गार अजित पवारांचे आहेत. काकांनी आपल्यालाच कसं व्हिलन केलं? हेदेखील त्यांनी या सभेत सांगितलं.
बंडाची सुरुवात २००४ मध्येच
२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे ७१ आमदार महाराष्ट्रात निवडून आले तर काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ शकला असता. मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद न घेता ते काँग्रेसला दिलं. त्याबद्दलही अजित पवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलं होतं. “२००४ ला आपले ७१ आमदार आले आणि काँग्रेसचे ६९ आमदार आले. त्यावेळी मला पक्षात फार महत्त्वाचं स्थान नव्हतं. त्यावेळी सोनिया गांधी यांनी विलासरावांना हे सांगितलं होतं की राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल. आम्हाला विलासरावांनी विचारलं की तुमच्यात मुख्यमंत्री कोण होईल? त्यावेळी छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांची नावं चर्चेत होती. पण आलेली संधी तेव्हा आपण चार खाती जास्त घेतली आणि आपण मुख्यमंत्री पद घेतलं नाही. ती संधी मिळाली असती तर ठामपणे सांगतो आजपर्यंत तुम्हाला राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री दिसला असता.” आपल्या काकांनी आपल्याला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही याची खंत त्यांनी नुकतीच एका सभेतही बोलून दाखवली. इतकंच नाही तर इंदापूरमध्ये झालेल्या सभेत २००४ लाच आत्ता जे केलं ते करायला हवं होतं असंही अजित पवार म्हणाले.
मूळ पवार आणि बाहेरचे पवार ही टीका शरद पवारांना भोवली
अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार फार काही बोलताना दिसत नाहीत मात्र त्यांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार हा जो उल्लेख केला त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. सुनेला शरद पवार बाहेरचे समजतात का? हा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. २०१९ ला अजित पवारांनी केलेलं बंड मोडण्यात शरद पवारांना यश आलं होतं. पण आत्ताची स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कारण अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ४२ आमदार आहेत. तसंच पक्ष, पक्ष चिन्ह सगळं निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिलं आहे. अशा स्थितीत काय घडतं हे ४ जूनचा निकाल ठरवणार आहे.
हे पण वाचा- “मी हे २००४ ला केलं असतं, तर बरं झालं असतं”, बंडाबाबत अजित पवार असं का म्हणाले?
बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातही संघर्ष
अजित पवार आणि शरद पवार यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असलेलं कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे ही काका पुतण्याची जोडी म्हणजे गुरु आणि त्याचा पट्टशिष्य अशीच होती. राज ठाकरे हे लहान असल्यापासूनच त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना व्यंगचित्राचे धडे दिले आणि राजकारणाचंही बाळकडू पाजलं. १९९१ ते २००४ या इतक्या प्रदीर्घ कालावधीत राज ठाकरेंचं शिवसेना या पक्षातलं महत्त्व प्रचंड होतं. मात्र या कारकिर्दीतली शेवटची दोन ते तीन वर्षे ही राज ठाकरेंसाठी जिकीरीची होती. त्यांची घुसमट होऊ लागली होती कारण उद्धव ठाकरे राजकारणात नव्याने आले होते. मागे एका लेखात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी सांगितलं होतं की, “राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंपेक्षा वयाने लहान आहेत. पण राज ठाकरेंचा राजकीय अनुभव हा उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त आहे. याचं कारण राज ठाकरे शालेय वयात असल्यापासूनच त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राजकीय दौरे करत होते. बाळासाहेब ठाकरेंच्या बोलण्याची लकब, त्यांचा अंदाज, नकला करुन दाखवणं हे सगळं राज ठाकरेंनी हुकमी उचललं होतं.” हे विधान लक्षात घेतलं तर त्यांची पक्षात होणारी घुसमट साहजिकच समजू शकते.
राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि..
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र. पण त्यांना सुरुवातीला राजकारणात तितकासा रस नव्हता. बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार त्यांचे पुतणे राज ठाकरेच होतील असं महाराष्ट्रालाही वाटलं होतं. मात्र उद्धव ठाकरे राजकारणात आल्यानंतर राज ठाकरेंची घुसमट वाढली. त्यानंतर अखेर त्यांनी शिवसेना या काकांच्या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. “माझा वाद माझ्या विठ्ठलाशी (बाळासाहेब ठाकरे) नाही तर विठ्ठलाच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे.” असं म्हणत त्यांनी शिवसेना सोडली. राज ठाकरेंचं हे बंड झाल्यानंतर शिवसेना फुटेल असं वाटलं होतं. मात्र तसं घडलं नाही. असं असलं तरीही राज ठाकरे अशा प्रकारे सोडून गेल्याचं दुःख बाळासाहेब ठाकरेंना होतंच. त्यांनी ही सल बोलूनही दाखवली होती.
हे पण वाचा- “पटलं नाही तर नव्याने निर्माण करा, आहे ते ओरबाडू नका”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमका रोख कुणाकडे?
राज ठाकरेंचंं नाव न घेता बाळासाहेबांची टोलेबाजी महाराष्ट्राने पाहिली
राज ठाकरे थेट पणे त्यांच्या काकांच्या (बाळासाहेब ठाकरे) आयुष्यातले व्हिलन ठरले नाहीत. पण अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे टीका करत होतेच. निवडणूक प्रचारात त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. “मी आज काय तुम्हाला नकला करुन दाखवू की अजून काही करुन दाखवू?”, “काल ठाण्यात आमच्या पुतण्याची सभा पार पडली त्याला गर्दी झाली होती का?” असे प्रश्न राज ठाकरेंबाबत बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे विचारले होते. तसंच उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका केली होती. ज्यानंतर उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाली तेव्हा राज ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर कारने सोडलं होतं. हा संदर्भ देऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना भर सभेतून प्रश्न विचारला होता की, “तेव्हा तुला (उद्धव ठाकरे) हा प्रश्न पडला नाही का? की याने बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे?” बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंवर निवडणूक प्रचाराच्या दरम्यान बरीच टीका केली. मात्र त्यांनी हा कधीही आरोप केला नाही की राज ठाकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेब ठाकरेंसह असलेल्या इतर सहकाऱ्यांनी मात्र राज ठाकरेंवर हे आरोप केले. राज ठाकरेंनी कधी त्याला उत्तर दिलं कधी दिलं नाही. मात्र मराठीचा मुद्दा राज ठाकरेंनी शिवसेनेकडून मनसेच्या उदयानंतर उत्तम प्रकारे हायजॅक केला होता. २७ डिसेंबर २००५ ला राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर ९ मार्च २००६ या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांना सुरुवातीला चांगलं यश मिळालं. आता त्यांचा पक्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. मात्र थेट नाही पण अप्रत्यक्षपणे राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या आयुष्यात व्हिलन ठरले हे आज तरी नाकारता येणार नाही.
मुंडे घराण्यातही काका पुतण्यांचा वाद
महाराष्ट्राच्या राजकारणातलं तिसरं चर्चेतलं घराणं आहे ते म्हणजे मुंडे घराणं. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघीही राजकारणात आहेत. मात्र त्याआधी राजकारणात आले ते धनंजय मुंडे. गोपीनाथ मुंडेंनी भाजपाचा ओबीसी चेहरा तयार करण्यात सिंहाचा वाटा उचलला. भाजपाचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे हयात नाहीत. मात्र ते हयात असतानाच बीडच्या राजकारणात त्यांचे पुतणे धनंजय मुंडे हे राजकारणात सक्रिय झाले होते. गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत असताना धनंजय मुंडे हे परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण करत होते. धनंजय मुंडे यांची काम करण्याची शैली ही काका गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणेच होती. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार त्यांचे पुतणे धनंजय मुंडेच ठरतील असा अनेकांचा अंदाज होता. मात्र २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे हे बीड मतदारसंघातून निवडून आले आणि लोकसभेत खासदार म्हणून गेले तेव्हा त्यांच्या विधानसभा मतदार संघातून पंकजा मुंडेंना म्हणजेच त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली गेली. यामुळे धनंजय मुंडे चांगलेच नाराज झाले. विधान परिषदेवर त्यांना संधी देण्यात आली. मात्र धनंजय मुंडेंनी २०१२ हे वर्ष उजाडलं तेव्हा काका गोपीनाथ मुंडेंविरोधात बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. त्यानंतर काका पुतण्यांमधला हा वाद शरद पवारांनी हेरला. ज्याचा परिणाम असा झाला की धनंजय मुंडेंनी २०१३ मध्ये काकांविरोधात दंड थोपटत बंड पुकारलं. बीडच्या राजकारणात आपण काय काय केलं आणि करु शकतो हेच त्यांनी भाषणात बोलून दाखवलं तसंच काका गोपीनाथ मुंडेंवरची नाराजीही बोलून दाखवली. २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन झालं. मात्र त्यानंतर ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांपासून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष सुरु झाला. जो २०२३ पर्यंत म्हणजेच अजित पवार सत्तेत सहभागी होईपर्यंत महाराष्ट्राने पाहिला आहे. आता धनंजय मुंडे हे अजित पवारांसह असल्याने महायुतीचा भाग आहेत. पंकजा मुंडे या लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांचा प्रचार धनंजय मुंडे करताना दिसणार आहेत. मात्र काका गोपीनाथ मुंडेंसाठी धनंजय मुंडे व्हिलन ठरले होते हे वास्तव नाकारता येणार नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काका पुतण्यांच्या या तीन जोड्या प्रामुख्याने पाहिल्या. राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करुन वेगळी भूमिका घेतली आहे. तर धनंजय मुंडेंनी अजित पवारांसह जात सत्तेत सहभागी होणं पसंत केलं आहे. मात्र या तीन काकांची आणि त्यांच्या बंडखोर पुतण्यांची चर्चा कायमच महाराष्ट्र करताना दिसतो यात शंका नाही.