DK Shivakumar Slaps Congress Worker : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा आता थंडावल्या आहेत. उद्या (७ मे) तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, ज्या-ज्या मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे त्या त्या मतदारसंघांमध्ये रविवारी (५ मे) सायंकाळपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघांमधील उमेदवारांनी रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पूर्ण ताकद पणाला लावून प्रचार केला. दरम्यान, रविवारी प्रचार करताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करून भाजपाने शिवकुमार यांच्यार टीका केली आहे.
हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ कर्नाटकच्या हावेरीमधील धारवाड येथील आहे. येथील काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विनोदा असूती यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने धारवाडमध्ये प्रचारसभेचं आयोजन केलं होतं. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार या प्रचारसभेला उपस्थित होते. सभास्थळी पोहोचल्यानंतर शिवकुमार कारमधून बाहेर पडले. त्याचवेळी त्यांच्या अवतीभोवती काँग्रेस कार्यकर्ते आणि लोक जमा झाले. शिवकुमार यांच्या चोहोबाजूंनी लोक जमले होते. त्याचवेळी एका काँग्रेस कार्यकर्त्याने शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवकुमार यांनी त्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर इतर कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांनी त्याला ढकललं. तसेच ते त्याला तिधून बाजूला घेऊन गेले. अलाउद्दीन मनियार असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे.
कर्नाटक भाजपाने शिवकुमार यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. भाजपाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, डी. के. शिवकुमार काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले असताना काँग्रेसचे कार्यकर्ते ‘डीके डीके’ अशा घोषणा देत होते. शिवकुमार कारमधून बाहेर पडले तेव्हा एका कार्यकर्त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यामुळे संतापलेल्या शिवकुमार यांनी त्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. नगरपालिका सदस्य अलाउद्दीन मनियार असं त्या कार्यकर्त्याचं नाव आहे.
तर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीदेखील हाच व्हिडीओ शेअर करून शिवकुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. मालवीय यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या व्हिडीओसह एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हावेरीमधील सानूर शहरात निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या प्रचारसभेला हजेरी लावली. कारमधून बाहेर पडताच त्यांच्या अवतीभोवती काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले होते. त्याचवेळी शिवकुमार यांनी नगरपालिकेतील सदस्य अलाउद्दीन मनियार यांच्या कानशिलात लगावली. मनियार यांचा गुन्हा काय होता? तर त्यांनी केवळ शिवकुमार यांच्या खांत्यावर हात ठेवला होता.