Ravindra Chavhan in Dombivli Assembly Constituency : २००९ मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ झाला होता. तेव्हापासून या मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व राहिलं आहे. या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून रवींद्र चव्हाण आमदार राहिले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा विचारसरणीचा प्रभाव असलेलं शहर म्हणून डोंबिवलीची जनसंघापासून ओळख आहे. या मतदारसंघात मराठी (खासकरून कोकणी), गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय असे बहुभाषिक लोक राहत असल्याने त्यांचं एकगठ्ठा मतदान भाजपाला होत आलं आहे.
२०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात बहुरंगी लढत झाली होती. तर, २०१९ मध्येही भाजपा, काँग्रेस आणि मनसे अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. राज्याच्या राजकारणात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे आता महायुतीकडून या मतदारसंघावर कोण दावा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार रवींद्र चव्हाण हे मंत्री असून गेल्या तीन टर्मपासून सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येत आहेत. परंतु, डोंबिवलीतील रखडलेली अनेक कामे, वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांचा प्रश्न, एमआयडीसीला लागत असलेल्या आगी आदी प्रश्न अद्यापही सुटलेले नसल्याने तसंच, मंत्री असूनही मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास न नेल्याने त्यांच्याविरोधातही वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली तरी यंदा त्यांना महाविकास आघाडीला टफ फाईट द्यावी लागणार आहे.
तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून या मतदारसंघावर कोणीही दावा केला तरी त्यांना भाजपाच्या पारंपरिक मतदारसंघातील निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे. भाजपाचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे स्पष्ट आहे. तसंच २०१९ मध्ये रवींद्र चव्हाण यांना मनसेचे श्रीकांत हळबे यांनी टफ फाईट दिली होती. श्रीकांत हळबे यांना ४१ हजार ३११ मते मिळाली होती. तर, रवींद्र चव्हाण यांना ८३ हजार ८७२ मते मिळाली होती. मनसेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगलेच वर्चस्व आहे. तसंच, कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील आहेत. त्यांचाही आजूबाजूच्या शहरात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे मनसेही या जागेवरून उमेदवार उभा करू शकतो. परिणामी महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे अशी तिहेरी लढत यंदाही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
डोंबिवलीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत
डोंबिवली विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे रवींद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. तर, महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही.
२००९ पासून कोणाला किती मते मिळाली?
२००९ मध्ये रवींद्र चव्हाण यांना ६१ हजार १०४ मते, मनसेच्या राजेश कदम यांना ४८ हजार ७७७ मते आणि आरपीआयच्या शंकरलाल पटेल यांना ९ हजार ६४ मते मिळाली होती. तर, २०१४ मध्ये रवींद्र चव्हाण यांना ८३ हजार ८७२ मते, शिवसेनेच्या दिपेश म्हात्रे यांना ३७ हजार ६७४ आणि मनसेच्या हरिश्चंद्र पाटील यांना ११ हजार ९७८ मते मिळाली होती. तसंच, २०१९ मध्ये रवींद्र चव्हाण यांना ८६ हजार २२७ मते, मनसेच्या मंदार हळबे यांना ४४ हजार ९१६ आणि काँग्रेसच्या राधिका गुप्ते यांना ६ हजार ६१३ मते मिळाली होती.
डोंबिवली विधानसभा मतदारसंघात किती मतदार?
हा मतदारसंघ खुला प्रवर्गातील असून येथे २०१९ च्या आकडेवारीनुसार एकूण मतदारांची संख्या ३ लाख ३८ हजार ३३० एवढी आहे. यामध्ये १ लाख ७४ हजार ५४४ पुरुष मतदार आणि १ लाख ६३ हजार ७३४ महिला मतदार आहेत. २०१९ मध्ये ४४.७२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा किती टक्के मतदान होतंय, कोणाला होतंय यावर इतर गणितं अवलंबून आहेत.
प्रचारसभा, रॅलींचा धडाका
रवींद्र चव्हाणांसाठी हा मतदारसंघ पारंपरिक असला तरीही त्यांच्यासमोर ठाकरेंच्या दीपेश म्हात्रे यांचे आव्हान होते. त्यांनीही तळागाळापर्यंत आपला जनसंपर्क ठेवला असल्याने रवींद्र चव्हाणांनी यावेळी प्रचारसभा, रॅली आणि दारोदीर जाऊन भेटी घेण्याची धडाका लावला होता.
ताजी अपडेट
डोंबवली विधानसभा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात मोडतो. या जिल्ह्यात एकूण ५६.०५ टक्के मतदान झालं आहे. यंदा नेहमीपेक्षा जास्त मतदान झाल्याने या सर्वाधिक मतदानाचा फायदा कोणाला होतो हे पाहावं लागणार आहे.
नवीन अपडेट
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे रविंद्र चव्हाण यांचा विजय झाला असून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे दीपेश म्हात्रे यांचा ७७ हजार मतांच्या फरकाने पराभव झाला आहे.