काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेलीच्या जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून रायबरेलीतून राहुल गांधी यांना तर अमेठीतून किरोशीलाल शर्मा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. राहुल गांधी आणि किशोरीलाल शर्मा हे दोघेही आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबियांवर सणसणीत टीका केली आहे. तसंच, नाव न घेता सोनिया गांधी यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. ते पश्चिम बंगालच्या वर्धमान- दुर्गापूर येथे बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, निवडणुका लागायच्या दोन महिने आधीच मी सांगितलं होतं की, यांची सर्वांत मोठी नेता निवडणूक लढवण्याची हिंमत करणार नाही. ती घाबरून पळून जाणार. ती पळून राजस्थानात गेली आणि राजस्थानातून राज्यसभेत आली.

हेही वाचा >> काँग्रेसचं ठरलं! रायबरेलीतून राहुल गांधी, तर अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी

“मी आधीच सांगितलं होतं की शहजादे वायनाडमध्ये हरणार आहेत. आणि हरण्याच्या भितीने वायनाडमध्ये मतदान संपल्यावर ते तिसरी जागा शोधायला सुरुवात करतील. आणि आता दुसऱ्या जागेवरूनही त्यांचे चेले चपाटे म्हणत होते की अमेठी येतील, अमेठी येतील. पण अमेठीलाही इतके घाबरले की आता तिथूनही पळून ते रायबरेलीत रस्ता शोधत आहेत. फिरून फिरून ते सगळ्यांना म्हणत होते की घाबरू नका. मीही आज त्यांना म्हणतो की घाबरू नका.. पळू नका…”, अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो.या जागांवर पारंपारिकपणे गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवतात. मात्र, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रायबरेलीची जागा रिकामी झाली आहे. तर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल गांधीचा पराभव केल्यानंतर ही जागाही काँग्रेसला गमवावी लागली आहे.

अमेठी आणि रायबरेलीत काँग्रेस विरोधात भाजपा

दरम्यान, भाजपाने अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जाागांसाठी उमेदवारांची घोषणा केली असून अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तर रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये रायबरेलीतून सोनिया गांधी यांनी दिनेश प्रताप सिंह यांचा पराभव केला होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont be afraid narendra modis sarcasm after rahul gandhi got the nomination from raebareli sgk