लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून जनतेने यंदा संभ्रमित निर्णय दिला आहे. एनडीए आघाडीला बहुमत मिळालं असलं तरीही इंडिया आघाडीनेही काही राज्यांत चांगली कामगिरी केली आहे. भाजपाला त्यांच्याच पारंपरिक मतदारसंघातही मोठा फटका बसला आहे, तर काँग्रेसने काही राज्यांत पहिल्यांदाच खातं उघडलं आहे. यंदाची निवडणूक शरद पवार गटाने तुतारी चिन्हावर लढवली. मात्र, यावेळी पिपाणी चिन्हही असल्याने मतदारांमध्ये गोंधळ झाल्याचं जयंत पाटील म्हणाले. ते आज माध्यमांशी बोलत होते.

“देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतपेटीच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा अभिप्राय जनतेने दिला आहे”, असं पाटील म्हणाले. तसंच, चिन्हातील गोंधळामुळे काही जागा गेल्या असंही ते म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांमध्ये आमची तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्हं होते. तर त्या चिन्हांशी काहीसे साम्य असलेल्या पिपाणी देखील चिन्हं होत. या दोन चिन्हांतील गोंधळाचा फटका आम्हाला बसला आहे. परिणामी, पिपाणीला दीड लाख मतं गेली असून साताऱ्याची सीट पडण्यास हे चिन्हंच कारणीभूत आहे. पिपाणीला दीड लाख मतं गेली आहेत. तर साताऱ्याची सीट ४५ हजारांनी पडली, यात ३७ हजार मतं पिपाणीला गेली आहेत.”

तुतारी समजून लोकांनी पिपाणीवर बटण दाबलं

पुढे जयंत पाटील म्हणाले की, “बारामती, बीड मधला माणूस उभा राहिला, त्याला बीएसपीपेक्षाही अधिक मतं मिळाली. आम्ही भाषण करायचो, तुतारी चिन्हं सांगायचो. पण लोकांमध्ये संभ्रम झाला आणि तुतारी समजून अनेकांनी पिपाणीवर बटण दाबले. याचा आम्हाला सर्वाधिक फटका बसला. मात्र, ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं.”

आम्हाला अडीच जिल्ह्यांचा पक्ष हिणवलं जायचं

जयंत पाटील म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचार केल्याने महाविकास आघाडीला मोठं बळ मिळालं. ३२ जागा आम्हाला मिळतील अशी अपेक्षा होती, एक दोन जागा सोडल्या तर जवळपास आकडा आम्हाला मिळाला आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी आणि आमचे युवा अध्यक्ष आम्ही गेलो होतो. दरम्यान, आम्हाला अडीच जिल्ह्यांचा पक्ष म्हणून हिणवले जायचं, मात्र आज आम्ही ८ जागा निवडून आणल्या आहेत. तर भाजपला ९ जागा मिळाल्या आहेत. तरीही आम्हीही त्यांना म्हणणार नाही की तो अडीच जिल्ह्यांचा पक्ष आहे, असेही जयंत पाटील यानी म्हटले आहे.

आमचे ८ खासदार राज्याचे प्रश्न ठामपणाने मांडतील. कांदा, कपाशी, ऊसाचा अथवा शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही लावून धरु. आता एक टप्पा झाला आहे. यात ८० टक्के स्ट्राइक रेट आम्ही दाखवलेला आहे. राज्यातले सरकार उखडून लावण्यासाठी आम्ही आमचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम उद्या जाहीर करु”, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

फडणवीसांच्या राजीनाम्यावर काय बोलले पाटील?

जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी उद्विग्न होऊन असे उद्गार का काढलेत हे माहिती नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. दिल्लीत बसलेले लोक त्यांचे भविष्य ठरवू शकतात. मात्र, महाराष्ट्रातली परिस्थिती, दोन पक्ष फोडल्यामुळे, सोबतच महागाई, बेकारी, जीएसटी यामुळे लोकं त्रस्त झाली होती. महाराष्ट्रातली कहाणी याच्याही पुढे आहे. राज्याच्या कारभाराला लोक कंटाळली आहेत. अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागल्या आहेत. लोकसभेसाठी देखील फडणवीस यांनी पूर्णपणे काम केलंय. मात्र आता तो त्यांचा तो निर्णय आहे. असे जयंत पाटील म्हणाले.

Story img Loader