उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) जनचौपाल रॅलीसाठी बिजनौरला प्रत्यक्ष जाणार होते आणि तिथून ते नागरिकांशी थेट संवाद साधणार होते. मात्र खराब हवामानुळे पंतप्रधान मोदींचा बिजनौर दौरा रद्द झाला आहे. आता ते व्हर्चुअली संवाद साधत आहेत.
दरम्यान, आपल्या ऑनलाईन भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मी सर्वप्रथम तुमची माफी मागतो कारण निवडणूक आयोगाकडून काहीशी मूभा मिळाल्याने मी बिजनौरमधून निवडणूक प्रचार सुरू करावा असा विचार करत होतो, पण खराब हवामानामुळे माझे हेलिकॉप्टर निघू शकले नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी तुमच्याशी ऑनलाईन माध्यमातून भेटत आहे.
मोदींनी आतापर्यंत पश्चिम यूपीमध्ये तीन व्हर्च्युअल रॅलींना संबोधित केले आहे. १० फेब्रुवारीपासून सात टप्प्यातील निवडणुका सुरू होतील तर मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे.
यावेळी मोदींनी समाजवादी पक्षावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, ”२०१७ पूर्वी उत्तर प्रदेशातही विकासाच्या नदीचे पाणी आटले. हे पाणी खोट्या समाजवाद्यांच्या कुटुंबात, त्यांच्या जवळच्या मित्रांमध्ये साचले होते. या लोकांनी सामान्य माणसाच्या तहानेची कधीच पर्वा केली नाही. ते फक्त आपली तहान शमवत राहिले, आपल्या तिजोरीची तहान भागवत राहिले.”
तसेच, पश्चिम उत्तर प्रदेशातील बिजनौर, मुरादाबाद जिल्ह्यांतील सरकारच्या योजनांबाबत मोदी म्हणाले की, ”आमच्या सरकारने एक जिल्हा एक उत्पादन योजनेत बिजनौरच्या नगीना वुड आर्टचा समावेश केला आहे. त्यामुळे बिजनौरच्या कलेची ओळख परदेशातही वाढत आहे. जगभर प्रसिद्ध असलेल्या मुरादाबादचे पितळही वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट योजनेशी जोडले गेले आहे. गंगा एक्स्प्रेस वेच्या रूपाने या भागाला मोठी भेट मिळणार आहे.”