देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्यांचं मतदान शनिवारी पूर्ण झालं. त्यापाठोपाठ आलेल्या एक्झिट पोल्समध्ये प्रामुख्याने एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. खुद्द मोदीपासून भाजपाच्या सर्व नेत्यांनी ४०० पारचा दिलेला नारा जरी प्रत्यक्षात उतरताना दिसत नसला तरी सत्तास्थापनेचं बहुमत भाजपाकडे असेल, असे कल एक्झिट पोलमधून समोर आले आहेत. पण दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपाप्रणीत महायुतीला मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यावरून राज्यात दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, यांनी महाराष्ट्रासंदर्भात एक्झिट पोलचे हे आकडे चुकणार असून ४ जूनला महायुतीलाच जास्त जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे. पण त्याचवेळी निवडणुकांपूर्वी भाजपामध्ये प्रवेशाचा मानस उघडपणे बोलून दाखवणारे एकनाथ खडसे यांनी भाजपालाच कानपिचक्या दिल्या आहेत. भाजपाला राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसल्याचं विधान एकनाथ खडसेंनी केलं आहे.
“हा फोडाफोडीच्या राजकारणाचाच परिणाम”
भाजपाला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला आहे का? अशी विचारणा केली असता एकनाथ खडसेंनी त्यावर होकारार्थी प्रतिक्रिया दिली. “नक्कीच. महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण झालंय, त्याचा फटका भाजपाला बसताना दिसतोय. राज्यभरात फोडाफोडीचं राजकारण मतदारांनी अमान्य केलं आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतला. उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंकडे गेला. मूळ पक्ष ज्यांचा आहे, ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले, त्यांच्या हातून ते इतरांच्या हातात जाणं या फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
फुटीर राजकारणाला जनतेने मतदानातून उत्तर दिलं? काय सांगतात एक्झिट पोल
“या प्रकारांमुळेच अजित पवारांना या निवडणुकीत फारसा प्रतिसाद दिसत नाहीये. एकनाथ शिंदेंनाही फारसा प्रतिसाद दिसत नाहीये. उद्धव ठाकरेंचा पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा राहील. शरद पवारांच्या १० पैकी ८ किंवा ६ जागा जिंकून येतील असं एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे”, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी भाजपाबरोबरच अजित पवार गट व एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केलं.
काय आहे महाराष्ट्राच्या एक्झिट पोलमध्ये?
महाराष्ट्रातील एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार महाविकास आघाडी व महायुती यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल. त्यात महायुतीनं ४० हून अधिक जागांचे दावे केले होते. अजूनही त्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी महायुतीला ३८ ते ४१ जागा मिळतील, हा दावा कायम ठेवला आहे. मात्र, एक्झिट पोलमध्ये महायुतीला २२ ते २५ जागा मिळतील, असे अंदाज समोर आले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं हे अपयश असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
© IE Online Media Services (P) Ltd