Eknath Shinde : “मुख्यमंत्री करा म्हणत ते दारोदारी भटकत आहेत, त्यांचा चेहरा मित्रपक्षांनाही..”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

आज निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका (फोटो-एकनाथ शिंदे, फेसबुक पेज, उद्धव ठाकरे, फेसबुक पेज)

Eknath Shinde : महायुतीच्या मेळाव्यात आज निलेश राणे यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. निलेश राणे हे शिवसेनेत आले आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसंच मी नारायण राणे यांनाही धन्यवाद देईन की त्यांनी निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी होकार आणि संमती दिली. असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच नितेश राणेंनाही मी शुभेच्छा देतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशामुळे प्रचाराला सुरुवात

निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आता कुडाळ मालवण या ठिकाणी शिवसेना म्हणजेच महायुतीची ताकद वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना कुडाळमधून २६ हजार मतांचा लीड होता. मला विश्वास वाटतो आहे की निलेश राणे यांना ५२ हजारांचा लीड मिळेल असंही वक्तव्य एकनाथ शिंदेंनी भाषणात केलं.

दोन वर्षांपूर्वी धाडस केलं आणि..

२०१९ ला महायुतीला मतदान झालं होतं. एकनाथ शिंदेने तेव्हा धाडस केलं आणि राज्यात महायुतीचं सरकार आणलं. आम्ही सरकारमध्ये होतो तरीही विरुद्ध दिशेने गेलो कारण बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांनी सोडले त्यांच्याबरोबर आम्ही राहिलो नाही. बाळासाहेबांच्या विचारांशी ज्याने बेईमानी केली त्याचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव करणाऱ्या काँग्रेससमोर ज्यानी गुडघे टेकले त्याचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले आहेत. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच कोकणाच्या विकासात ज्यांनी कायम खोडा घातला त्यांना धडा शिकवायचा आहे. हे विसरु नका. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

ज्याचा चेहरा मित्रलक्षांना चालत नाही तो चेहरा..

शिवसेना वाचवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मी उठाव केला आणि त्याला ५० आमदारांनी साथ दिली आजही ते सर्व आमदार माझ्यासोबत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत व्यक्त यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. आमच्यावर टीका करणारे आज मला मुख्यमंत्री करा करा म्हणत दारोदारी भटकत आहेत, मात्र यांचा चेहरा मित्रपक्षांना चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल असे मत व्यक्त केलं. आम्ही शिवसेना सोडली नाही तर ती बरोबर नेली, धनुष्यबाण वाचवला. बाळासाहेब असताना सगळे लोक मातोश्रीवर यायचे. आज दिल्लीतल्या गल्ल्यांमध्ये फिरावं लागतं आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde criticized uddhav thackeray said he is going door to door for cm post scj

First published on: 23-10-2024 at 23:56 IST
Show comments