New CM of Maharashtra महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. अत्यंत प्रचंड आणि घवघवीत यश महायुतीला मिळालं आहे. मागच्या तीन दशकात एकाही युती किंवा आघाडीला असं यश मिळवता आलं नव्हतं. २३ नोव्हेंबरच्या या निकालावर विरोधकांनी काही प्रमाणात संशय व्यक्त केला आहे. मात्र आता महायुतीसमोरचा पुढचा पेच आहे मुख्यमंत्री कोण? याचा. दरम्यान आज एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विसर्जित झालं आहे. राजभवनावर पोहचत एकनाथ शिंदे यांनी राज्यपालाकांडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे १४ वी विधानसभा विसर्जित झाली आहे.
मुख्यमंत्री कोण होणार यावरुन भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत पेच
महायुतीत भाजपाला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला सलग तिसऱ्यांदा १०० पार जागांचं यश मिळालं आहे. त्यांच्या नावे हा रेकॉर्डच तयार झाला आहे. तर एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) शिवसेनेला ५७ आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारांच्या ४ अशा ६१ जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री या पदावर दावा सांगितलेला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आमची काही हरकत नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलं आहे. तर संघानेही देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाच अनुमोदन दर्शवलं आहे. दुसरीकडे शिवसेनेची मागणी वेगळी आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मागणी काय?
महाराष्ट्रात महायुतीला जे यश मिळालं ती विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) नेतृत्वात लढवण्यात आली होती. त्यामुळे महायुतीने आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून होते आहे.महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवला जावा अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचं काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देऊन मोठा निर्णय घेणार?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आज एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. कारण आज महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपते आहे. राजीनामा दिल्यानंतर ते त्यांची मागणी काय आहे हे सांगू शकतात किंवा देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा जाहीर करण्याचा मोठा निर्णयही घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले आहेत. तर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असेल असंही कळतं आहे. नेमकं काय होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही.
हे पण वाचा- Devendra Fadnavis : समंदर लौटकर आ गया! देवेंद्र फडणवीस… राजकीय चक्रव्यूहात न अडकलेला अभिमन्यू !
एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यावर काय होईल?
एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर १४ वी विधानसभा विसर्जित झाली आहे. १५ वी विधानसभा स्थापन होईल आणि राज्यपाल महायुतीला नेता निवडण्याबाबत सूचना देतील तसंच सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देतील. या सगळ्या घडामोडी घडेपर्यंत जो कालावधी जाईल त्या कालावधीत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.
एकनाथ शिंदे यांची पोस्ट काय?
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.