Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मंदा म्हात्रे यांच्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वाक्य उच्चारलं आणि त्यामुळे मंदा म्हात्रे या भावूक झालेल्या पाहण्यास मिळाल्या.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
“महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे. देशाच्या प्रगतीचं इंजिन आहे यात काही शंकाच नाही. त्यामुळे आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे. मी आज तुम्हाला सगळ्यांना हेच आवाहन करतो आहे की महायुतीचं सरकार निवडून आणा.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी म्हटलं आहे.
मंदा म्हात्रे या फायरब्रांड नेत्या
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मंदा म्हात्रे या महाराष्ट्राच्या डॅशिंग नेत्या आहेत. आमची लाडकी बहीण आहेत. स्वतःसाठी काही करत नाहीत, जनतेची कामं करतात. मंदाताई आमच्या फायरब्रांड लीडर आहेत. आपला आवाज आणि ब्रांड त्या लोकांसाठीच वापरत आल्या आहेत. मंदा म्हात्रे यांनी कधीही स्वार्थ साधला नाही.” असं एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले.
हे पण वाचा- प्रचारात मागे राहाल, पालिकेच्या तिकिटाला मुकाल, एकनाथ शिंदे यांच्याकडून बदलापुरात सर्व पक्षियांची कान उघाडणी
मी कोमट पाणी प्या सांगणारा मुख्यमंत्री नाही-एकनाथ शिंदे
लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यासह सगळ्यांनी ठरवलं आहे की २० तारीख कधी येते आणि आपण महायुतीला मतदान कधी करतो याची ते वाट बघत आहेत. मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही. मी पायाला भिंगरी लावून फिरणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून कोमट पाणी प्या, फेसबुक लाइव्हवर हे सांगणारा मुख्यमंत्री नाही. लोकांमध्ये जाणारा, संवाद साधणारा, लोकांची दुःखं जाणून घेणारा मुख्यमंत्री आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले आणि मेरी आवाज सुनो म्हणणारा नाही तर जनतेचा आवाज ऐकणारा मुख्यमंत्री आहे असंही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
…आणि मंदा म्हात्रेंना अश्रू अनावर
मंदाताईसारखी आपली लाडकी बहीण निवडून आली पाहिजे ना? असा प्रश्न विचारताच सगळे हो म्हणाले. बेलापूरमधून मंदाताई निवडून आलीच पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले त्यावेळी मंदा म्हात्रे यांना अश्रू अनावर झाले. मंदाताई म्हात्रे जे काही नवी मुंबईसाठी मागतील ते दिल्याशिवाय महायुती राहणार नाही. आपली निशाणी कमळ आहे, ते बटण दाबून मंदा म्हात्रेंना निवडून द्या असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं.मंदाताईंच्या विरोधात जे लढत आहेत त्यांची गाठ एकनाथ शिंदेशी आहे हे लक्षात ठेवा. ज्यांनी ज्यांनी बेईमानी केली आहे, त्यांचा एक एकेचा हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही हे मी आज सांगू इच्छितो असंही एकनाथ शिंदे म्हणाले.