शिवसेना पक्ष फुटल्यापासून दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा करत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की, आमचा पक्ष हीच खरी शिवसेना आहे, कारण आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालत आहोत. आम्ही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाने बाळासाहेबांच्या विचारांना डावलून औरंगजेबाचे विचार जवळ केले आहेत. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसचा नेहमी विरोध केला, उद्धव ठाकरे हे त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. एकनाथ शिंदे यांनी दी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्ष, सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं, तसेच विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे यांना यावेळी विचारण्यात आलं की, शिवसेना फुटल्यापासून तुम्ही सातत्याने दावा करत आहात की तुमचा गट हीच खरी शिवसेना आहे. मात्र उद्धव ठाकरे हेदेखील जोरदार प्रचार करत आहेत. तुम्हाला गद्दार तर स्वतःला खरी शिवसेना म्हणत आहेत. अशातच खरी शिवसेना कोणाची आहे ते या निवडणुकीतून स्पष्ट होईल असं म्हटलं जातंय, याबद्दल तुमचं मत काय आहे? एकनाथ शिंदे म्हणाले, खऱ्या-खोट्या शिवसेनेबद्दल बोलायचं झाल्यास मी एवढंच सांगेन की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चाललेलो आहोत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे ज्या गोष्टी बाळासाहेबांना मान्य नव्हत्या, नेमक्या त्याच गोष्टी करत आहेत. त्यांना सावरकर नको तर औरंगजेब हवा आहे. त्यांची विचारधारा बदलली आहे. लोक मतदान करताना या गोष्टीचा नक्कीच विचार करतील.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही विचारधारेसह विकासासाठी काम करत आहोत. आम्ही त्यांच्यासारखे निष्क्रिय नाही. आम्ही केवळ खुर्चीवर बसून फेसबूक लाईव्ह करत नाही. घरात बसून राज्य चालवता येत नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानात उतरावं लागतं. मुळात लोक कोणाला मत देतील? त्यांची कामं करणाऱ्याला की घरी बसणाऱ्याला? त्यांनी (उद्धव ठाकरे) केवळ कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे.” परंतु, उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात राजकीय प्रचारसभा घेत आहेत. प्रचारफेऱ्यांमध्ये सहभागी होत आहेत… यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “या सगळ्याला केवळ डॉ. एकनाथ शिंदे जबाबदार आहेत. त्यांच्या (उद्धव ठाकरे) मानेवरचा पट्टा मी उतरवला आहे, याचं श्रेय मला द्यायला हवं.”

हे ही वाचा >> “भाजपा ४०० पार जाणारच!” अजूनही नरेंद्र मोदी ठाम

पक्ष फुटीमुळे जनता संभ्रमावस्थेत आहे. अनेकांना तुमचं पक्ष सोडून जाणं पटलेलं नाही, याबाबत काय सांगाल? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, मी स्वतःच्या फायद्यासाठी हे सगळं केलं नाही. केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी हे पाऊल उचललं. तुम्ही अजित पवारांचं उदाहरण घ्या. ते अलीकडेच म्हणाले, मी शरद पवारांचा पुत्र असतो तर शरद पवारांनी असं केलं असतं का? अजित पवार हे हुशार आहेत, त्यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव आहे. पक्ष चालवण्याची त्यांची क्षमता आहे. तरीही त्यांच्यावर पक्षात अन्याय झाला. आमच्या पक्षात तशी स्थिती नव्हती. तसेच मलादेखील कुठलीही राजकीय महत्त्वकांक्षा नव्हती. परंतु, आदित्य ठाकरेंना पुढे करून तुम्ही (उद्धव ठाकरे) माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केलात, हेदेखील चुकीचं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde says i removed uddhav thackeray neck collar so he is roaming around asc