लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं तरी महाराष्ट्रात महायुतीचे अनेक मतदारसंघातील उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत. राज्यातल्या अनेक जागांवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपात रस्सीखेच चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महायुतीने नुकताच दोन जागांबाबतचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. अनेक दिवसांपासून चर्चा चालू असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभेबाबतचा तिढा आता सुटला आहे. महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना येथून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेवर त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्याला संधी दिली आहे. राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना शिंदे गटाने औरंगाबाद लोकसभेचं तिकीट दिलं आहे. महाविकास आघाडीत औरंगाबादची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली असून ठाकरे गटाने या मतदारसंघातून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये दोन शिवसैनिक भिडणार आहेत. या मतदारसंघात संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध एमआयएमचे खासदार (औरंगाबादचे विद्यमान खासदार) इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेदेखील उमेदवार उभा केला आहे. या उमेदवारामुळे चंद्रकांत खैरेंचं नुकसान होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
१८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीतच भुमरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समोर आलं आहे. मात्र या जागेवर भाजपाबरोबर रस्सीखेच चालू होती, त्यामुळे शिंदे गटाने या जागेवरील त्यांचा उमेदवार जाहीर केला नव्हता.
हे ही वाचा >> “…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील हेदेखील छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. महायुतीत ही जागा शिंदे गटाला मिळाली तर आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर या जागेबाबत आणि उमेदवारीबाबत चर्चा करू असं विनोद पाटील म्हणाले होते. मात्र शिंदे गटातील इतर इच्छुक नेते आणि विनोद पाटलांना बाजूला सारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीपान भुमरे यांना संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.