Eknath Shinde vs Congress in Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. काँग्रेसच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी त्यांच्या मुलासह आज (३१ ऑक्टोबर) शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे कोल्हापुरात शिंदेची शिवसेना मजबूत होण्यास मदत होणार आहे. जाधव यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी प्रमुख तसेच शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती देखील केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाधव यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे खासदार नरेश म्हस्के, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमांद्वारे या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. शिंदे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज (३१ ऑक्टोबर) आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात सन्मानाने स्वागत करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जयश्री जाधव यांचे सुपूत्र सत्यजित जाधव यांनी देखील यासमयी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला”.

हे ही वाचा >> मनसेविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, दीपोत्सवावरून थेट निवडणूक आयोगाला पत्र; अमित ठाकरे अडचणीत येणार?

पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे काय म्हणाले?

जयश्री चंद्रकांत जाधव यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांना कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी प्रमुख तसेच शिवसेना उपनेतेपदी नियुक्त केल्याचे जाहीर केले. तर सत्यजित जाधव यांच्याकडे उद्योग क्षेत्राच्या संबंधित जबाबदारी सोपविण्यात येईल असेही जाहीर केले. जयश्री जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक भक्कम झाली असल्याचे मत यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले. विद्यमान आमदार असूनही त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपल्याला महिला भगिनींसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली, ही खरोखरच कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या असून या योजना कोल्हापूरातील सर्वसामान्य महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला”.

हे ही वाचा >> Ajit Pawar : विस्मृतीत गेलेल्या सिंचन घोटाळ्याची फाईल अजित पवारांनीच उघडली? यावेळी कोण वाहून जाणार?

यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, मित्रा महामंडळाचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर, शिवसेना उद्योग आघाडीचे अध्यक्ष उदय सावंत तसेच कोल्हापूर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.