Eknath Shinde on Maharashtra New Chief Minister : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांचं स्वागत केलं. निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच तुम्ही भेटत आहात. तुमच्या माध्यमांतून सगळ्या मतदारांचे आभार मानतो. हा जो विजय आम्हाला मिळाला तो अभूतपूर्व विजय आहे. गेल्या अनेक वर्षांत असा निकाल जनतेने दिलेले नाही. मागच्या अडीच वर्षात महायुतीने उत्तम काम केलं आहे. एकीकडे विकासकामं केली, महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच दुसरीकडे कल्याणकारी योजना राबवल्या. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली असंही एकनाथ शिंदे म्हणाले.यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी त्यांची भूमिका मांडली एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंना त्यांनी टोलाही लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी आणि शाह अडीच वर्षे पर्वताप्रमाणे आमच्या पाठिशी-एकनाथ शिंदे

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे घेऊन गेलो. आनंद दिघे यांचे विचार घेऊन गेलो. आम्ही पर्वताप्रमाणे तुमच्या मागे उभे आहोत असं आम्हाला अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. आम्हाला त्यांनी मुख्यमंत्रिपद दिलं. मी त्या प्रत्येक दिवसाचा, क्षणाचा वापर राज्याच्या हितासाठी केला. मी मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो. कारण त्यांचं पाठबळ लाभलं. या सगळ्या अडीच वर्षांच्या काळात प्रगतीचा वेग वाढला. मी अडीच वर्षांच्या माझ्या कालावधीत समाधानी आहेत. आमच्या सरकारमध्ये जे निर्णय झाले ते आजवर आम्ही जे निर्णय घेतले ते रेकॉर्डब्रेक आहेत. पत्रकार असोत, शेतकरी असो, लाडक्या बहिणी असोत सगळ्यांचे प्रश्न आम्ही सोडवले. आमच्या काळात १२४ सिंचन प्रकल्प तयार झाले आहेत. या राज्याच्या प्रगतीचा वेग वाढला आहे. असंही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, “लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ ही ओळख कुठल्याही पदापेक्षा..”

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) पुढे म्हणाले, “मी समाधानी आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. मी नाराज वगैरे मुळीच नाही, मी रडणारा माणूस नाही तर लढणारा माणूस आहे. आम्ही सगळेच लढणारे आहोत, लढून काम करणारे लोक आहोत” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आणि उद्धव ठाकरेंना टोला लगवाला. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले, “आम्ही लोकांमध्ये गेलो, घरी बसलो नाही. आम्ही जे काम केलं ते मनापासून केलं. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करत राहिन” असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मी लोकप्रियता मिळवण्यासाठी काम केलेलं नाही-एकनाथ शिंदे

मी लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कुठलंही मोजमाप व्हावं म्हणून मी काम केलं नाही. तर सरकार म्हणून काय देऊ शकतो ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. केंद्र सरकार पर्वताप्रमाणे उभं राहिलं हे मी पुन्हा एकदा सांगू शकतो. दोन ते अडीच वर्षांत लाखो कोटींचा निधी आम्ही केंद्राकडून मिळवला. त्यामुळे मी एवढंच सांगेन की कुठे घोडं अडलं आहे? मी मनमोकळेपणाने सांगतो आहे, मी काहीही ताणून धरलेलं नाही. मी मोदींना फोन करुन सांगितलं की सरकार बनवताना कुठलीही अडचण आहे माझ्यामुळे हे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. एकनाथ शिंदेंची अडचण होणार नाही हे मोदी आणि अमित शाह यांना सांगितलं. त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde taunts to uddhav thackray in thane pc said this thing about him scj