India Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Updates, 20 May : सार्वत्रिक निवडणुकीचा आज पाचवा टप्पा पार पडत आहे. महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. डोक्यावर उन्हाचा तडाखा वाढत असला तरीही घराबाहेर पडून लोक मतदान करत आहेत. सामान्य नागरिकांपासून ते नेतेमंडळी, सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला असून त्यांनी महिलांनाही मतदान करण्याचं खास आवाहन केलं आहे. तर, श्रीकांत शिंदेंचा विजय पक्का असल्याचाही विश्वास त्यांनी आज व्यक्त केला. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
“मी महिलांना आवाहन करेन की महिलांनी लवकर येऊन मतदान करावं. महिलांनी आज घरातील कामं बाजूला ठेवून मतदानाला यावं. तसंच, इतरांनाही मतदानाचं आवाहन करून नरेश म्हस्के यांना भरघोस मतदान करावं”, असं लता शिंदे म्हणाल्या.
श्रीकांत शिंदे गेल्या दोन टर्मपासून कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. यंदा तिसऱ्यांदा ते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर यावेळी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर-राणे यांच्यांशी त्यांचा मुकाबला होत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, “श्रीकांत निवडूनच आलेला आहे. त्याच्याबद्दल काय सांगणार. जनता त्याच्याबरोबर आहेत. तो हॅट्ट्रिक करूनच निवडून येणार”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >> मतदारसंघाचा आढावा : कल्याण- डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यापुढे ठाकरे गटाचे आव्हान कितपत?
शिवसेनेत बंड झाल्यानंतरची ही सर्वांत मोठी निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक अग्नीपरीक्षा वाटते का? असं विचारलं असता लता शिंदे म्हणाल्या, “अग्निपरीक्षा वाट नाही. कारण त्यांच्या नसानसात समाजकारण भिनलेलं आहे, यात नवीन काहीच नाही. आम्हालाही हे नवीन नाही. आम्हीही पहिल्यापासूनच समाजकारणातच आहोत.”
कल्याणमध्ये शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना
कल्याणमध्ये शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना अशी थेट लढत आहे. ठाकरे गटाने वैशाली दरेकर-राणे यांना उमेदवारी दिली आहे. तर, शिंदे गटाने श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन विजयाची हॅट्ट्रिक करणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. कल्याणचे दोनदा प्रतिनिधीत्व केलेले डॉ. श्रीकांत शिंदे यांना गेल्या सहा महिन्यांत ठाकरे गटापेक्षा मित्र पक्ष म्हणजे भाजपशीच अधिक दोन हात करावे लागले. भाजप आणि शिंदे यांच्यातील संबंध एवढे ताणले गेली की डॉ. शिंदे यांनी पत्रक काढून राजीनाम्याचा पवित्रा घेतला होता. तसेच आगामी निवडणूक लढविण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा विषय फारच ताणला गेल्याने भाजपच्या वरिष्ठांनी मध्यस्थी केली. पण स्थानिक पातळीवर शिंदे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सूत जुळू शकले नाही. ‘नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे’ या एकाच मुद्द्यावर डोंबिवलीत कितीही नाराजी असली तरी डॉ. शिंदे यांना पाठिंबा मिळू शकतो.
मतांच्या गणिताचा लाभ
कल्याण लोकसभेतील कळवा-मुंब्रा हा काँग्रेस-राष्ट्रवादी, डोंबिवली भाजप-संघाचा प्रभाव असलेले मतदारसंघ आहेत. उल्हासनगर, अंबरनाथ संमिश्र, कल्याण ग्रामीण आगरी बहुल मतदारसंघ आहेत. कल्याण लोकसभेत २८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. कधी नव्हे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या प्रचार सभामध्ये यावेळी दिसले. मुंब्र्यात एकगठ्ठा मतदान व्हावे यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.