आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्यासह संजय राऊतही होते. साईबाबांवर आमची श्रद्धा आहे. असं संजय राऊत म्हणाले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री शिर्डीत का आलेत माहीत नाही
“मुख्यमंत्री शिर्डीत का आले माहीत नाही. आम्ही शिर्डीत साईबाबांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहोत. शिर्डीत मुख्यमंत्री का धावाधाव करत आहेत माहीत नाही. शिर्डीतला त्यांचा उमेदवार शंभर टक्के पडणार आहे. आमचे भाऊसाहेब वाघचौरे यांना शिर्डीच्या साईबाबांचाही आशीर्वाद आहे आणि जनतेचाही आशीर्वाद आहे.” असं संजय राऊत म्हणाले.
आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या १३ जागांसाठी मतदान झालं, त्यातल्या दहा आम्ही जिंकू
“आधीच्या पाच आणि आत्ताच्या आठ एकूण १३ जागांवर मतदान झालं आहे. त्यातल्या १० जागा आम्ही जिंकू” असंही संजय राऊत म्हणाले तसंच अजित पवारांवरही त्यांनी भाष्य केलं. “निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा आहे. अतिरिक्त शाखा असलेल्या आयोगाकडून निष्पक्ष कामाची अपेक्षा आत्ता करणं चूक आहे. आमचं सरकार उद्या केंद्रात येईल तेव्हा घटनात्मक संस्थांची फेररचना आम्ही करु. आधीप्रमाणे राजकीय हस्तक्षेप न करता काम करतील असं आम्ही पाहू.” असंही संजय राऊत म्हणाले.
हे पण वाचा “शिंदेंच्या हाताखाली काम करावं लागण हे कर्माचं फळ, फडणवीस असे अर्धवट…”, संजय राऊतांची ‘रोखठोक’ टीका
देवेंद्र फडणवीस नखशिखांत भ्रष्टाचारी
देवेंद्र फडणवीस यांच्या केसांपासून नखांपर्यंत भ्रष्टाचार आहे. आता त्यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटते आहे. तुम्ही सत्तेवर असताना फोन टॅपिंग केलं आहे तर मग तुम्ही म्हणत आहात मी नाही त्यातली कडी लावा आतली असं कसं चालेल? यानंतर संजय राऊत यांना विचारण्यात आलं की असं बोललं जातं आहे की एकनाथ शिंदे लोकसभेनंतर भाजपासह राहणार नाहीत. त्यावर संजय राऊत म्हणाले लोकसभेनंतर ते राजकारणातच राहणार नाहीत.