विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत एकूण ११ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारख्या मंत्र्यांचा समावेश आहे, ज्यांनी भाजपा ओबीसी आणि दलितांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत राजीनामा दिला होता. त्यानंतर गुरुवारीही भाजपाच्या सहा आमदारांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला.
गुरुवारी राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये विनय शाक्य, मुकेश वर्मा आणि सीताराम वर्मा यांचा समावेश आहे. त्याचवेळी योगी सरकारमध्ये मंत्री असलेले धरमसिंह सैनी यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, बाला प्रसाद अवस्थी आणि राम फेरान पांडे यांनीही भाजपाचा राजीनामा दिला आहे. या सर्वांसह सहा आमदारांनी गुरुवारीच पक्षाचा राजीनामा दिला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठे धक्के बसत आहेत. स्वामी प्रसाद मौर्य आणि दारा सिंह चौहान यांच्यानंतर धरमसिंह सैनी यांनी राजीनामा दिला आहे. धरमसिंह सैनी हे योगी मंत्रिमंडळात आयुष मंत्री आहेत. यापूर्वी, नकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार धरमसिंह सैनी यांनी सरकारी निवासस्थान आणि सुरक्षा सोडल्याचे वृत्त होते.
राज्यपालांकडे सोपवलेल्या राजीनाम्यात धरमसिंह सैनी यांनी, “ज्या अपेक्षांसह दलित, शेतकरी, मागासलेले, सुशिक्षित बेरोजगार, लहान आणि मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन प्रचंड बहुमताचे भाजप सरकार स्थापन केले, त्यांच्याकडे आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे मी उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे,” असे म्हटले.
त्याचवेळी, धरमसिंह सैनी यांच्या राजीनाम्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे. “सामाजिक न्यायाचे आणखी एक योद्धा डॉ. धरमसिंह सैनी यांच्या आगमनाने, सर्वांशी समेट घडवून आणणाऱ्या आमच्या सकारात्मक आणि पुरोगामी राजकारणाला अधिक उत्साह आला आहे. ताकद मिळाली. सपामध्ये त्यांचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
निवडणुकीच्या तयारीत असलेल्या सत्ताधारी भाजपाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. गुरुवारी तीन राजीनामे आले असून त्यात एक मंत्री आणि दोन आमदारांचा समावेश आहे. याआधी योगी मंत्रिमंडळात मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य आणि मंत्री दारा सिंह चौहान यांनीही राजीनामा दिला आहे.