लोकसभेची निवडणूक झाली. आता लवकरच जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या चार राज्याच्या विधासभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आयोगाकडून निवडणूक याद्या अद्ययावत करण्यासंदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २० ऑगस्टपर्यंत मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या जम्मू-कश्मीरमध्ये २०१८ पासून विधानसभा अस्तित्वात नाही. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत घेण्यात याव्यात, असा आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागले आहे. जम्मू-काश्मीर बरोबरच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्याही निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : लोकसभा झाली, आता विधानसभा! निवडणूक आयोगानं जारी केली महत्त्वाची माहिती; २५ जूनची तारीखही ठरली!

कारण हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर रोजी संपत आहे. तसेच झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ रोजी संपत आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे या निवडणुका निवडणूक आयोगाला घ्याव्या लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या चारही राज्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने जम्मू आणि काश्मीरसह महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना गुरुवारी एक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून संभाव्य तारखा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच २५ जूनपासून निवडणूक पूर्व विशेष मोहीम सुरु होईल. त्यानंतर मतदार याद्या अद्ययावत करण्यात येतील.

तसेच २५ जुलैला प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर मतदरांना ९ ऑगस्टपर्यंत हरकती घेता येतील. त्यानंतर २० ऑगस्टपर्यंत अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असं वृत्तात म्हटलं आहे. याबरोबरच महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या राज्यांच्याही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी पत्र देण्यात आले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.