Haryana Assembly Election Dates: हरियाणा विधानसभेच्या मतदानाची तारीख आता बदलण्यात आली आहे. याआधी घोषणा झाल्यानुसार १ ऑक्टोबर रोजी मतदान आणि ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र आता ५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. जम्मू आणि काश्मीरचीही मतमोजणी आता ८ ऑक्टोबर रोजीच होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

बिश्नोई समाजाच्या सणासाठी निर्णय

बिश्नोई समाजाने १ ऑक्टोबरच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. अखिल भारतीय बिश्नोई महासभा, बिकानेर या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षांनी शिष्टमंडळासह निवडणूक आयोगाकडे तारीख बदलण्याची मागणी केली होती. २ ऑक्टोबर रोजी बिश्नोई समाजाचा मोठा सण आहे. यासाठी हजारो बिश्नोई कुटुंब राजस्थानमधील त्यांच्या मूळ गावी असतात. शेकडो वर्षांपासून समाजातर्फे हा सण साजरा करण्यात येत आहे. यामुळे बिश्नोई समाजाचा मतदानाचा अधिकार हिरावला जाण्याची शक्यता आहे. या मागणीनंतर निवडणूक आयोगाने तारखांमध्ये बदल जाहीर केला आहे.

हे वाचा >> Haryana Politics : हरियाणात भाजपा की काँग्रेस? दुष्यंत चौटाला अन् चंद्रशेखर आझाद यांच्या युतीमुळे कुणाचे ‘टेन्शन’ वाढवणार?

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, मतदारांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवणे आणि शेकडो वर्ष जुन्या परंपरेचा सन्मान करण्यासाठी आम्ही निवडणूक पुढे ढकलत आहोत. बिश्नोई समाजाचे गुरू जांभेश्वर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३०० वर्षांपासून ही परंपरा समाजाकडून जोपासली जात आहे.

दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये मात्र तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. १८ सप्टेंबर रोजी पहिला टप्पा, दुसरा टप्पा २५ सप्टेंबर आणि तिसरा टप्पा १ ऑक्टोबर रोजी पार पडेल. तर मतमोजणी हरियाणा राज्याबरोबरच ८ ऑक्टोबर रोजी केली जाईल.

हे वाचा >> Dera chief Ram Rahim: बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार राम रहीम पुन्हा एकदा तुरूंगातून बाहेर; हरियाणा विधानसभा निवडणुकीशी संबंध?

हरियाणात विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरियाणात फटका बसला होता. २०१९ साली त्यांना हरियाणात १० जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना फक्त पाच जागा जिंकण्यात यश मिळाले. हरियाणामध्ये बिश्नोई समाजाची संख्या बऱ्यापैकी आहे. बिश्नोई समाजाचे मूळ हे शेजारच्या राजस्थान राज्यात असले तरी गेल्या काही वर्षांत अनेकजण हरियाणामध्येही स्थायिक झाले आहेत. त्यामुळे या समाजाच्या मतावर सर्वच पक्षांचा डोळा आहे.