ECI Action On Telangana DGP : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर सकाळपासून काँग्रेस पक्षाने विजयी घोडदौड सुरू केली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत काँग्रेस बहुमत मिळविणार असे चित्र स्पष्ट झाले, तसे काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी जल्लोष साजरा केला. यात पोलिस अधिकारीही मागे नव्हते. दुपारी राज्याचे पोलिस महासंचालक अंजनी कुमार यांनी रेवंत रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन व्यक्त केले. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही कृती त्यांना चांगलीच महागात पडल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाने सदर प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अंजनी कुमार यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने सदर वृत्त एक्स या सोशल मीडिया साईटवर दिले आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे महासंचालक अंजनी कुमार यांनी राज्याचे पोलिस नोडल अधिकारी संजय जैन आणि नोडल (खर्च) अधिकारी महेश भागवत यांच्यासह उमेदवार असलेल्या रेवंत रेड्डी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदनही केले होते. निवडणूक आयोगाने या भेटीवर आक्षेप घेतला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

हे वाचा >> Telangana : अभाविप, टीडीपी ते काँग्रेस; कधी काळी तुरुंगात गेलेले रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार?

नोव्हेंबर महिन्यात देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यापैकी आज (३ डिसेंबर) चार राज्यांचा निकाल लागत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत भाजपाने बहुमत मिळवले असून काँग्रेसने तेलंगणा या एकमात्र राज्यात विजय मिळविला आहे. यामुळे तेलंगणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना अनेकजण शुभेच्छा देत होते. त्यातच पोलिस अधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेल्यामुळे निवडणूक आयोगाचे याकडे लक्ष वेधले गेले.