देशात लोकसभेची निवडणूक एकूण सात टप्प्यात पार पडत आहे. या सात टप्प्यांपैकी दोन टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. आता तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. मात्र, गेल्या दोन टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या टक्केवारी संदर्भात निवडणूक आयोगाने निराशा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांत शहरी भागातील मतदार मतदानाबाबत उदासीन असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील निवडणूक बाकी असून या उर्वरित पाच टप्प्यांमध्ये मतदान वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यातील मतदानात ४ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ३ टक्के मतदानामध्ये घट झाली आहे. पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर ६६.१४ टक्के मतदान झाले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात ८८ जागांवर ६६.७१ टक्के मतदान झाले.
हेही वाचा : निकालात काँग्रेसला नीचांकी जागा मिळतील; पंतप्रधान मोदी यांचा दावा
शहरी भागातील मतदानात घट
निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत शहरी मतदारसंघातील मतदानामध्ये लक्षणीय घट झाल्याचे आयोगाने म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोग शहरी जागांवर मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, याचा जास्त प्रमाणात फायदा झाला नसल्याचे दिसून येत आहे. या वर्षी मतदानात घट झालेल्या शहरांपैकी गाझियाबादचा समावेश आहे. येथे २०१९ मध्ये ५५.८८ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावेळी केवळ ४९.८८ टक्के मतदान झाले, म्हणजेच जवळपास ६ टक्के मतदान घटले आहे.
तसेच उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगरमध्ये २०१९ मधील ६०.४ टक्के मतदानाच्या तुलनेत यावेळी फक्त ५३.६३ टक्के मतदान झाले आहे. बेंगळुरू सेंट्रल आणि बेंगळुरू दक्षिणमध्ये २६ एप्रिल रोजी मतदान झाले. येथेही अनुक्रमे फक्त ४५.०६ आणि ५३.२७ टक्के मतदान झाले. दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसने निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की, मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक उपक्रम राबवले. मात्र, तरीही शहरी मतदारांवर याचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही.
हेही वाचा : “मी आलो आणि भंडारा संपला”, संजय निरुपम यांचे पक्षप्रवेशावेळी विधान; एकनाथ शिंदेंची ‘अशी’ होती प्रतिक्रिया
दरम्यान, निवडणूक आयोगाला आता आशा आहे की, पुढच्या पाच टप्प्यांमध्ये होणाऱ्या मतदानामध्ये शहरी भागातील मतदानाचा टक्का आणखी वाढेल. या संदर्भात आयोग संबंधित शहरांच्या प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करेल. या संदर्भात निवडणूक आयोगाने विशेष कृती आराखडा हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीच्या अंतिम मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात विलंब झाल्याबद्दल विरोधी पक्षांनी टीका केली होती. यासंदर्भातही निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले असून योग्य आकडेवारी जाहीर करणे ही आमची जबाबदारी आहे. यामध्ये पूर्णपणे पारदर्शकतेची काळजी घेतली जाते. मात्र, पुढील टप्प्यांत ही आकडेवारी अधिक वेगाने सादर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.