Election Commission Writes To Maharashtras Chief Secretery : जम्मू -काश्मीर आणि हरियाणात विधानसभा निवडणुकांची धामधुमी सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या सचिवांना पत्र लिहिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं होतं. एकाच जागी तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनाही हे पत्र लिहिलं होतं. परंतु, आयोगाच्या या पत्राकडे मुख्य सचिवांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दिलेल्या कालावधीत केलेल्या सूचनांचा अहवाल का दिला नाही याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयागोने आता दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ३१ जुलै रोजी सर्वांत आधी हे पत्र पाठवलं होतं. त्यानंतर, २२ ऑगस्ट, ११ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर रोजी असे तीनवेळा स्मरणपत्र पाठवले होते. तरीही महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडून उत्तर न आल्याने त्यांनी ताशेरे ओढले आहेत. तीनवेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर का पाठवले नाही, याबाबत स्पष्टीकरण देण्याच्या सूचना आता देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >> निवडणूक आयुक्त मुंबईत; विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठका

जम्मू-काश्मीर आणि हरियाणात निवडणुका, महाराष्ट्रात कधी?

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा येथील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर हरियाणा येथे ५ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. तसंच, झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार आहे.

निवडणूक आयुक्त मुंबई दौऱ्यावर

महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांचे गुरुवारी रात्री मुंबईत आगमन झाले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.