शेतकरी आंदोलन, करोना हाताळणी, बेरोजगारी आदी मुद्यांवरून विरोधकांनी उभे केलेले आव्हान मोडीत काढून भाजपाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी चौकार लगावला. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच; पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केले आहे. या विजयानंतर भाजपाकडून जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे शिवसेनेनं मात्र त्यांना, ” विजयाचे अजीर्ण होऊ नये,” असं म्हणत शुभेच्छा दिल्यात. तसेच या निवडणुकीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल याबद्दलही अगदी मोजक्या शब्दातून शिवसेनेनं टोला लगावलाय.
नक्की वाचा >> Election Results: “महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं”
लोकांना पर्याय मिळतो तेव्हा ते बदल घडवितात
“पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत व निदान उत्तर प्रदेशात तरी ‘ऑपरेशन गंगा’ सफल झाले आहे. उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, पंजाब आणि उत्तराखंड अशा पाच राज्यांतील निकालांनी भारतीय जनता पक्षाला उत्साहाचे भरते येणे साहजिक आहे. पंजाब वगळता इतर चार राज्यांत भाजपने सत्ता राखली आहे. संपूर्ण केंद्रीय सत्ता, देशभरातील भाजपाचे बळ, प्रचंड धनसत्ता, हाताशी असलेली अमर्याद साधनसंपत्ती या बळावर भाजपाला विजय मिळाला नसता तरच नवल होते. भाजपाच्या विजयाचे विश्लेषण थोडक्यात करायचे तर जिथे भाजपाला पर्याय होता, तिथे मतदारांनी भाजपाला पराभूत केले. पंजाबातील ‘आप’चा मोठा विजय हे त्याचे उदाहरण. पंजाबात काँग्रेसचे राज्य होते, ते त्यांनी स्वतःच घालविले. पंजाबच्या जनतेला ‘आप’च्या रूपाने एक पर्याय मिळाला व सत्ताधारी काँग्रेससह भाजपा, अकाली दलाचा दारुण पराभव तिथे झाला. पंजाबात मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, अकाली दलाचे बादल पिता-पुत्र, काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर असे सर्व दिग्गज पराभूत झाले आहेत. लोकांना पर्याय मिळतो तेव्हा ते बदल घडवितात,” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: अखिलेश घाबरले, राजनाथांनी टाळले, पण योगींनी करुन दाखवले; आता एवढे विक्रम होणार योगींच्या नावे
गोव्यात आप, तृणमूल काँग्रेसने पसारा मांडला, त्याचा फायदा भाजपाला झाला
“मणिपुरात भारतीय जनता पक्षाला आघाडी मिळाली, पण बहुमताचा आकडा गाठता आला नाही व ६० आमदारांच्या जागेत भाजपने ३२ जागा जिंकल्या. त्यामुळे इतर बरेच लोक निवडून आले त्यांना घेऊन भाजपा सत्ता राखू शकेल. उत्तराखंडमध्ये काँग्रेस चांगली टक्कर देईल असे वाटले होते, पण ७० पैकी ४६ जागा जिंकून भाजपाने सत्ता कायम राखली. उत्तराखंडात काँग्रेसची दौड १८ वरच थांबली. गोव्यातील निकाल पाहता भाजपाने जवळजवळ बहुमत गाठले आहे. काँग्रेसचा गोव्यात चांगला जम असतानाही काँग्रेस बारा जागांवरच रखडून पडली. भाजपला २० पर्यंत मजल मारता आली. पणजीत उत्पल पर्रीकर हे पराभूत झाले. बाबूश मोन्सेरात यांचे चरित्र व चारित्र्य पाहता पणजीची जनता बाबूश महोदयांना कायमचे घरी पाठवील अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. गोव्यात आप, तृणमूल काँग्रेसने पसारा मांडला, त्याचा फायदा शेवटी भारतीय जनता पक्षालाच झाला, पण संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते ते उत्तर प्रदेशात काय निकाल लागतात याकडे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
मायावती या कुठेच नव्हत्या व त्यांनी भाजपाशी अंतर्गत हातमिळवणी केली
“योगी व मोदी यांना तिथे निर्विवाद कौल मिळाला आहे. या वेळीही ‘तीनशेपार’ अशी घोषणा होती. तीनशेपार आकडा गेला नसला तरी पावणेतीनशेच्या जवळ पोहोचून भाजपाने सगळ्यांना चकीत केले आहे. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी व मित्रपरिवार १८० चा आकडा गाठेल असे चित्र शेवटपर्यंत होते. तसा प्रतिसाद त्यांना मिळत होता, पण यादवांना दीडशेचा टप्पा गाठता आला नाही. मायावती या कुठेच नव्हत्या व त्यांनी भाजपाशी अंतर्गत हातमिळवणी करून एकप्रकारे योगीबाबांना मदत केली,” असं लेखात म्हटलंय.
…तेव्हा लोकशाही व निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते
“उत्तर प्रदेशात विकासापेक्षा जाती-पोटजातीचेच राजकारण जास्तच चालत आले आहे. या वेळी ‘हिजाब’ वादाच्या बरोबरीने जात-पातही चालविण्यात भाजपा यशस्वी झाला. उत्तर प्रदेशातील गंगेच्या प्रवाहात शेकडो प्रेते वाहून जाताना लोकांनी पाहिली, पण त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपाला मतदान केले. राकेश टिकैत हे शेतकऱ्यांचे नेते. त्यांनी सांगितले, ‘‘लोकांच्या मनात भाजपाविषयी राग होता, लोकांनी भाजपाला मतदान केले नाही, तरीही ते कसे विजयी झाले? हे गौडबंगाल आहे.’’ भारतीय जनता पक्ष कसा काय विजयी झाला? हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा लोकशाही व निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसे ते झालेच आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
निवडणूक कोणतीही असो, त्या निवडणुकीत भाजपा
“युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी जे मिशन राबवले त्यास ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव देऊन उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा प्रचार जोरात केला. म्हणजे युक्रेनमधील अडकलेल्या मुलांचा आक्रोश आणि दमछाक यांचा वापरही राजकीय फायद्यासाठी कसा करावा हे भाजपाकडून शिकावे, पण एक मात्र नक्की, निवडणूक कोणतीही असो, त्या निवडणुकीत संपूर्ण साधनसंपत्ती, प्रचार यंत्रणा, पैसा अशा आयुधांचा वापर करून भाजपा ताकदीने उतरत असतो. देशासमोर इतर प्रश्न कोणते आहेत याची फिकीर न करता पंतप्रधानांपासून गृहमंत्री व संपूर्ण केंद्रीय व राज्यांचे मंत्रिमंडळ झोकून देऊन मैदानात उतरत असते. पाचही राज्यांच्या प्रचार काळात याचा प्रत्यय आलाच,” असा टोला लगावण्यात आलाय.
पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
“उत्तर प्रदेशात यावेळी प्रियंका गांधीही काँग्रेसचे नेतृत्व करीत होत्या. त्यांच्या सभांना व प्रचाराला चांगला प्रतिसाद होता. प्रियंका आणि अखिलेश यांनी ही निवडणूक एकत्र लढवली असती तर अधिक चांगल्या प्रकारे टक्कर देता आली असती, पण गर्दीच्या गणितांवर सध्या आकडे ठरत नसतात. मोदी-शहांच्या सभांना गर्दी नाही व त्यांच्या सभेतील खुर्च्या रिकाम्या असल्याची छायाचित्रे या काळात प्रसिद्ध झाली, पण निकालात त्याचे प्रतिबिंब दिसले नाही. पंजाबातील निकालही डोळ्यात अंजन घालणारे आहेत. उत्तर प्रदेशातील जमिनीवर अखिलेश यादवांना हवेत तीर मारून चालणार नाही. अधिक गांभीर्याने त्यांना यापुढे निवडणूक लढवावी लागेल. प्रियंका गांधींनी आता कुठे लढाईला सुरुवात केली आहे. ती त्यांनी अर्धवट सोडू नये. पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? माकडांच्या हाती दारूची बाटली आल्यावर जे घडते तसेच काहीतरी होईल. पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण असते. भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये!,” असं लेखाच्या शेवटी म्हटलंय.