भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार प्रबोध तिर्की यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. अवघ्या सात महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर २०२३ मध्ये प्रबोध तिर्की यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता आपला अपमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानंतर पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, याविषयी प्रबोध तिर्की यांनी अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही.
नेमकं काय घडलं?
प्रबोध तिर्की यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं. सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकांबरोबरच ओडिशामध्ये चार टप्प्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. १३ मे ते १ जून या कालावधीत ओडिशामध्ये मतदान होणार आहे. याच निवडणुकीसाठी काँग्रेसनं प्रबोध तिर्की यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी जाहीर केलेली उमेदवारी रद्द करण्यात आल्यानंतर तिर्की यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले प्रबोध तिर्की?
“जेव्हा मी एअर इंडियातील माझी नोकरी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला शब्द देण्यात आला होता की मला आमदारकीचं तिकीट दिलं जाईल. त्यामुळे पक्षात प्रवेश केल्यापासून मी माझ्या मतदारसंघात झटून काम करायला सुरुवात केली. जेव्हा इथल्या पहिल्या यादीत माझं नाव जाहीर झालं, तेव्हा मला खूप आनंद झाला होता. पण दुसऱ्या यादीत माझ्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराचं नाव त्या मतदारसंघात जाहीर करण्यात आलं. असं का झालं हे मला माहिती नाही”, असं तिर्की यांनी सांगितलं.
“जर माझ्या उमेदवारीसंदर्भात पक्षाचा वेगळा विचार होता, तर त्यांनी माझ्याशी चर्चा करून आधी मला ते सांगायला हवं होतं. एक आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आणि एका आदिवासी युवकाचा अशा प्रकारे अवमान करणं चुकीचं होतं”, अशा शब्दातं ३९ वर्षीय प्रबोध तिर्की यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सांगलीतून सलग दुसऱ्यांदा काँग्रेसचा ‘हात’ गायब
पक्षाशी संपर्काचा प्रयत्न केला, पण…
दरम्यान, पक्षाशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नसल्याचं प्रबोध तिर्की यांनी म्हटलं आहे. “माझं नाव मागे घेण्यात आलं तेव्हा मला रडू आलं. अनेकदा प्रयत्न करूनही मी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांशी संपर्क करू शकलो नाही. माझ्याशी कुणीही संपर्क केला नाही किंवा मीही कुणाशी याबाबतीत संपर्क करू शकलेलो नाही. मग अशा मोठ्या पक्षात राहण्यात काय अर्थ आहे?” असा सवाल तिर्की यांनी केला आहे.
काँग्रेसची भूमिका काय?
काँग्रेसमधील सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीमध्ये या निर्णयाबाबत उल्लेख करण्यात आला आहे. तिर्कींच्या ऐवजी त्या मतदारसंघातून देवेंद्र भिटारिया अधिक योग्य उमेदवार होते, असं पक्षाचं मत होतं. निवृत्त सरकारी अधिकारी असणारे भिटारीया भुयान समुदायाचे असून त्यांचा या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. भिटारिया यांची कौटुंबिक पार्श्वभूमीही काँग्रेसचीच आहे.
तिर्की यांना ओडिशातील सुंदरगड लोकसभा मतदारसंघातल्या तालसरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. २ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या उमेदवार यादीत त्यांचं नावदेखील होतं. मात्र, १४ एप्रिलला पक्षानं जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत मात्र त्यांच्याऐवजी भिटारिया यांच्या नावाचा यादीत समावेश करण्यात आला होता.