Lok Sabha Election Exit Poll Result: सध्या देशभर एक्झिट पोल्सची चर्चा पाहायला मिळत आहे. जवळपास सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणीत एनडीएला ३५० हून जास्त जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीला १५० ते १७० जागा मिळण्याची शक्यता नमूद केली आहे. या पार्श्वभूमीवर एक्झिट पोल्सच्या आकड्यांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आम आदमी पक्षाला दिल्ली, हरियाणा व पंजाबमध्ये मोठ्या पिछाडीचा सामना करावा लागेल, असा अंदाज समोर आला असून त्यावर आपचे नेते संजय सिंह यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले संजय सिंह?

आम आदमी पक्षाला दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागेल, अशा अंदाजावर संजय सिंह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “पहिली गोष्ट म्हणजे एक्झिट पोल भाजपाच्या कार्यालयात तयार करण्यात आले आहेत. सर्व वाहिन्यांवरचे आकडे जवळपास सारखेच आहेत. कुणाला विश्वास बसेल की भाजपाला तामिळनाडूत ३४ टक्के मतं मिळणार आहेत? कुणाला विश्वास बसेल की आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये ० ते २ जागा मिळतील? तुम्ही असे आकडे देत आहात की ज्यावर लोक हसत आहेत”, असं संजय सिंह एएनआयवर म्हणाले.

“आपचा सगळ्यात जास्त राग भाजपाला आहे. त्यामुळे भाजपानं आपल्या कार्यालयात सांगितलं की पंजाबमध्ये आपला ० ते २ जागा मिळतील असं लिहा. तसं वाहिन्यांनी दाखवलं. त्यामुळे हा एक्झिट पोल भाजपाच्या कार्यालयात बनवण्यात आला आहे. हा मोदी सरकारचा एक्झिट पोल आहे. हा एक्झिट पोल जनतेचा खरा कौल दाखवत नाही. इंडिया आघाडीच्या वेगवेगळ्या पक्षांनी जो सर्व्हे केला, त्यानुसार इंडिया आघाडीला देशभरात २९५ हून जास्त जागा मिळतील”, असंही संजय सिंह म्हणाले.

“एक्झिट पोल्सची चेष्टा लावली आहे”

“कुणी ३५० जागा एनडीएला दिल्या आहेत, कुणी ४०० दिल्या आहेत. मला तर आश्चर्य वाटतंय की भाजपाला फक्त ४०० जागा कशा दिल्या गेल्या? अखंड भारतात त्यांच्या ७०० जागा निवडून येऊ शकतात. पाकिस्तानमधून शंभरेक जागा येतील, नेपाळमधून ५० निवडून येतील, ५० अफगाणिस्तानातून, ५० बांगलादेशातून, ३०-३५ श्रीलंकेतून, २०-२५ थायलंडमधून निवडून येतील. काही इंडोनेशियातून जिंकून येतील. अखंड भारतातून ७०० जागा द्या ना भाजपाला. एक्झिट पोल्सची चेष्टा लावली आहे”, अशी खोचक टीका संजय सिंह यांनी केली.

Exit Poll 2024 : काँग्रेसला एक्झिट पोल्सचे अंदाज अमान्य; पवन खेरा म्हणाले, “२००४ साली अटल बिहारी वाजपेयींना…”

“यामागे काय कारण असेल? एकतर तुम्ही खूप मोठा फेरफार केला आहे. त्याला सिद्ध करण्यासाठी हे असे एक्झिट पोल दिले आहेत. या सर्व एक्झिट पोलवाल्यांना जनतेच्या मताची अजिबात माहिती नाही. तुम्ही कुठेही जा, लोकांमध्ये महागाई, बेरोजगारीबाबत नाराजी आहे. पण तुमचे आकडे सांगतायत की भाजपा चहुबाजूंनी जिंकत आहे. हे कसं शक्य आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exit poll results 2024 350 plus seats for nda aap leader sanjay singh comment pmw