Exit Poll Result 2024: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. आज लोकसभा निवडणुकीचा अखेरचा म्हणजेच सातवा टप्पा पार पडला. त्यानंतर संध्याकाळी ६.३० नंतर एक्झिट पोल्स म्हणजेच निवडणूक निकालाचे अंदाज वर्तवण्यात आले. यामध्ये पुन्हा एकदा देशात एनडीए सरकार येणार हे निश्चित मानलं जातं आहे. एवढंच नाही तर नरेंद्र मोदी हे पंडित नेहरुंच्या विक्रमाशी बरोबरी करणार हे देखील निश्चित मानलं जातं आहे.
भाजपासह एनडीएचं ४०० पारचं स्वप्न पूर्ण होणं हे अवघड दिसतं आहे असं हे अंदाज सांगत आहेत. एकाही एक्झिट पोलने भाजपासह एनडीए ४०० पार जाईल असं म्हटलेलं नाही. कुठला सर्व्हे काय सांगतो आहे? हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत.
रिपब्लिक भारत-मैट्रीजच्या सर्व्हेने काय अंदाज वर्तवलाय?
एनडीए – ३५३ ते ३६८ जागा
इंडिया आघाडी – ११८ ते १३३ जागा
इतर- ४३ ते ४८ जागा
रिपब्लिक PMARQ चा अंदाज काय?
एनडीए – ३५९ जागा
इंडिया आघाडी – १५४ जागा
इतर- ३० जागा
जन की बातच्या एक्झिट पोलचा अंदाज काय?
एनडीए- ३६२ ते ३९२ जागा
इंडिया आघाडी- १४१ ते १६१ जागा
इतर- १० ते २० जागा
इंडिया न्यूज डी डायनामिक्सचा अंदाज काय सांगतो?
एनडीए -३७१ जागा
इंडिया आघाडी- १२५ जागा
इतर – ४७ जागा
एबीपी सी व्होटर्सच्या सर्व्हेचा अंदाज जागा काय?
एनडीए-३५३ ते ३८३ जागा
इंडिया आघाडी- १५२ ते १८२ जागा
इतर – ४ ते १२ जागा
हे पण वाचा- Maharashtra Exit Poll 2024 : असली-नकलीच्या राजकराणाला महाराष्ट्राची जनता कंटाळली? काय सांगतात एक्झिट पोल
चाणक्यचा सर्व्हे काय सांगतो आहे?
एनडीए ४०० ते ४१५ जागा
इंडिया आघाडी- १०७ ते १११ जागा
इतर ३६ जागा
देशात पुन्हा फुलणार कमळ
या सगळ्या सर्व्हेंचा अंदाज लक्षात घेतला तर देशात पुन्हा एकदा कमळ फुलणार हे निश्चित मानलं जातं आहे. इंडिया आघाडीने भाजपासह एनडीएला टक्कर देण्यासाठी रणनीती आखली होती. मात्र महाराष्ट्र वगळता इंडिया आघाडीचा फारसा परिणाम झाला आहे हे एक्झिट पोलचे अंदाज सांगत नाहीत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा एनडीए आणि भाजपाची सत्ता येईल आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान पदी विराजमान होतील हे नक्की मानलं जातंय. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंडित नेहरुंच्या विक्रमाची बरोबरी करतील असे संकेतच एक्झिट पोल्सनी दिले आहेत.
काय आहे पंडित नेहरुंच्या नावे असलेला विक्रम?
१५ ऑगस्ट १९४७ म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु यांनी शपथ घेतली. त्यानंतर २७ मे १९६४ या कालावधीत तेच देशाचे पंतप्रधान होते. सलग तीनवेळा भारताचे पंतप्रधान होण्याचा विक्रम हा पंडित जवाहरलाल नेहरुंच्या नावे आहे. त्यानंतर आता त्या विक्रमाशी नरेंद्र मोदी बरोबरी करणार हे निश्चित मानलं जातं आहे. एक्झिट पोल्सनी एनडीएसह भाजपाचा ४०० पारचा नारा पूर्ण होणार नाही हे म्हटलं असलं तरीही किमान ३५० जागा किंवा त्याहून अधिक जागा भाजपाला मिळतील असं म्हटलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंडित नेहरुंच्या या विक्रमाशी बरोबरी करतील असाच अंदाज वर्तवण्यात आला आहे.