India General Election Result 2024 Exit Poll Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यांमधील मतदान पार पडलं असून आता वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था आणि संस्थांचे एक्झिट पोल जाहीर होऊ लागले आहेत. बहुसंख्य एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे की, भाजपाचं ४०० पारचं स्वप्न भंगणार आहे. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला होता. मात्र देशात ३०० ते ३५० जागांवर भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना विजय मिळू शकतो. दरम्यान, महाराष्ट्रात भाजप्राप्रणित महायुतीने ४५+ जागा जिंकू असा दावा केला होता. मात्र महायुतीत अनेक पक्षांचा भरणा झालेल असूनही महायुतीच्या महाराष्ट्रातील जागा कमी होणार असल्याचा अंदाज टाईम्स नाऊ-ईटीजीच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मिळून (महायुती) २६ जागांवर विजय मिळेल. तर काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळून (महाविकास आघाडी) २२ जागांवर विजय मिळेल. महाविकास आघाडीने दावा केला होता की, त्यांना राज्यात ३५+ जागा मिळतील. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेले दावे चुकीचे ठरतील असा अंदाज टाईम्स नाऊ-ईटीजीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि संयुक्त शिवसेनेची (उद्धव ठाकरे) युती होती. तेव्हा या युतीने राज्यात ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे टाईम्स नाऊचा अंदाज खरा ठरला तर राज्यात महायुतीचा ४४ ते ४५ टक्के जागांवर पराभव होईल.
दरम्यान, एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार महायुतीला महाराष्ट्रात २५ जागाही मिळणार नाहीत. या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीला २४ आणि महाविकास आघाडीला २३ जागा मिळतील. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो. एबीपीच्या अंदाजानुसार सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय होऊ शकतो. एबीपीच्या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपाला १७, शिंदेंच्या शिवसेनेला ६, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळू शकते. तर महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला ९, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ६ आणि काँग्रेसला ८ जागा मिळू शकतात. यासह एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे.
मागील निवडणुकीत संयुक्त शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. मात्र आता शिवसेना फुटल्यानंतर १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले तर केवळ ५ च खासदार उद्धव ठाकरेंबरोबर राहिले आहेत. मात्र या निवडणुकीत ठाकरेंचे खासदार वाढू शकतात असं चित्र दिसतंय.
हे ही वाचा >> Exit Poll 2024 Live Update : पंजाबमध्ये काँग्रेसची भाजपासह आपवरही सरशी; शेतकरी आंदोलनाचा भाजपाला फटका?
इतर सर्वेक्षणांमधील आकडेवारी
इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स
महायुती – ३४
मविआ – १३
अपक्ष – १
न्यूज २४ चाणक्य
महायुती – ३३
मविआ – १५
रिपब्लिक भारत-मॅट्रीझ
महायुती – ३० ते ३५
मविआ – १३ ते १९
रिपब्लिक PMARQ
महायुती – २९
मविआ – १९
टीव्ही ९ पोलस्ट्राट
महायुती – २२
मविआ – २६
एबीपी-सी व्होटर
महायुती – २४
मविआ – २३