Vidhan Sabha Election Exit Polls 2023 Result Updates: देशभरात सध्या चर्चा आहे ती पाच राज्यांमधल्या एग्झिट पोल्सची आणि त्यातून समोर आलेल्या आकड्यांची. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या राज्यांमध्ये मतदान पूर्ण झालं असून येत्या ३ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे या निवडणुकांचे निकाल सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, एकीकडे प्रस्थापित संस्था व वृत्तवाहिन्यांचे एग्झिट पोल चर्चेत असताना दुसरीकडे सट्टाबाजारातले एग्झिट पोलही चर्चेत आले आहेत. आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी सट्टेबाजारातील हा एग्झिट पोल तीन दिवस आधीच शेअर केला असून ही पोस्ट आता पुन्हा व्हायरल होऊ लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय सांगतात ५ राज्यांचे एग्झिट पोल?

गुरुवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आलेल्या एग्झिट पोलमध्ये काँग्रेस भाजपा या दोन्ही राष्ट्रीय पक्षांबरोबरच इतर प्रादेशिक पक्षांसाठीही सतर्कतेचा इशारा दिसून येत आहे. या पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करेल, तर मध्य प्रदेशात भाजपा व काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. छत्तीसगडमध्ये बघेल सरकार आपल्या विकासकामांचा हवाला देत सत्ता कायम राखू शकतात, तर तेलंगणामध्ये बीआरएसला मोठा धक्का देत काँग्रेस मुसंडी मारू शकते. मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटला झोरम पीपल्स मूव्हमेंटकडून कडवी टक्कर अपेक्षित आहे.

या पाच राज्यांमधील एग्झिट पोल समोर आल्यानंतर ज्यांना पराभव अंदाजित केला आहे, त्या पक्षांनी या पोल्सवर विश्वास न ठेवता निकालाच्या दिवसाची वाट पाहाण्याचं आवाहन केलं आहे. तर ज्यांना विजय अंदाजित केला आहे, त्या पक्षांनी सर्वच ठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे ३ डिसेंबर रोजीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

काय सांगतो सट्टेबाजाराचा एग्झिट पोल?

दरम्यान, एकीकडे देशभरात या एग्झिट पोल्सची चर्चा होत असताना दुसरीकडे हर्ष गोएंकांनी तीन दिवसांपूर्वी एक्सवर (ट्विटर) केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सट्टेबाजारात पाच राज्यांचा एग्झिट पोल काय सांगतो, यासंदर्भातला तक्ता देण्यात आला आहे. हा तक्ता मध्य प्रदेशमधील फलोदी सट्टेबाजाराचा असल्याचंही त्यांनी खाली नमूद केलं आहे.

या अंदाजानुसार छत्तीसगडमध्ये भाजपाला ३७ तर काँग्रेसला ५० जागा मिळतील. अर्थात काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल. तेलंगणामध्ये काँग्रेस व बीआरएसला समसमान अर्थात ५३ जागा मिळतील, तर भाजपाला फक्त ४ जागांवर समाधान मानालं लागेल. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला ११७ जागा तर भाजपाला १०६ जागा मिळतील. त्यामुळे कडवी टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसला अवघ्या ६८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तिथे भाजपा ११५ जागांसह बहुमताचं सरकार स्थापन करण्याचा अंदाज आहे.

निकालाच्या दोन दिवस आधी या सगळ्या एग्झिट पोल्समुळे सर्वच राजकीय पक्ष खुर्चीच्या अगदी काठावर येऊन उत्सुकतेने व अधीरतेनं निकालांकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे ३ डिसेंबर रोजी मतपेट्या उघडल्यावर त्यातून नेमकं काय बाहेर पडणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exit polls 2023 five states election results satta bazar prediction pmw