काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केलेले माजी खासदार संजय निरुपम यांनी आज (३ मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. काँग्रेसने हकालपट्टी केल्यानंतर निरुपम शिवसेनेत जातील अशी चर्चा होती. सुरुवातीला निरुपम यांनी यावर भाष्य करणं टाळलं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी शिवसेनेतील नेत्यांच्या भेटी घेतल्या. पाठोपाठ त्यांनी बुधवारी (१ मे) मुंबईतील बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि संजय निरुपम यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेनंतर संजय निरुपम यांनी ते शिवसेनेच्या शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती. निरुपम यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तर पक्ष त्यांना कोणती जबाबदारी देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसने निरुपम यांना लोकसभेचं तिकीट नाकारल्यामुळे ते पक्षावर नाराज होते. तसेच त्यांनी पक्षाविरोधात वक्तव्ये केली होती. त्यामुळे पक्षाने गेल्या महिन्यात त्यांची हकालपट्टी केली होती. दरम्यान, आज त्यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदे गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

निरुपम यांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी तब्बल वीस वर्षांनी घरवापसी करत आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाण्यातील आनंद आश्रम येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेशावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, महायुतीचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदेंच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी निरुपम ताकद पणाला लावणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, २० वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सक्रीय होत असल्याबद्दल संजय निरुपम यांचं आम्ही स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीत स्वतःहून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण ताकद पणाला लावण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

हे ही वाचा >> मोदींनी महायुतीचे दरवाजे उघडल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंची भूमिका काय? राऊत म्हणाले, “त्यांना माहिती आहे…”

निरुपम यांच्याबरोबर मुंबई काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष जयप्रकाश सिंह, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस अंजय श्रीवास्तव, मुंबई काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष दिलीप राजपुरोहित, मुंबई काँग्रेस सचिव फिरोज शाह, रश्मी मेस्त्री, विधीज्ञ प्रद्युम्न वाघमारे, आनंद त्रिपाठी, मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष सूरज गुप्ता, बाळा तिवारी, अरुण सुवर्णा, पाचुराम जयस्वाल, सर्वेश जयस्वाल, अमित कोचरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expelled congress leader sanjay nirupam joins eknath shinde shivsena homecoming after 20 years asc