केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे वेळापत्रक जाहीर करताच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर खरगे यांनी एक्स (जुने ट्विटर) या सोशल मीडिया साईटवरून भाजपाला चिमटा काढणारी पोस्ट टाकली. ते म्हणाले, “पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निरोप समारंभाचीच एकप्रकारे घोषणा झाली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यात काँग्रेस पक्ष अधिक ताकदीने जनतेसमोर जाईल. लोकांचे कल्याण, सामाजिक न्याय आणि प्रगती साधणारा विकास हे काँग्रेस पक्षाचे आश्वासन आहे.”

काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी एएनआय या वृत्तावाहिनीशी बोलताना सांगितले, “पाचही राज्यातील जनता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवेल आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची नांदीच या निकालातून आपल्याला दिसेल. मध्य प्रदेशमधील ८.५ कोटी लोक भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी तयार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे थकलेले असून त्यांना आता निवृत्तीची गरज आहे.”

हे वाचा >> Assembly Election Dates 2023: निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, मध्य प्रदेशासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

मध्य प्रदेशमध्ये २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ११४ जागा जिंकल्या होत्या. बहुमताच्या आधारावर कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकारदेखील स्थापन करण्यात आले. मात्र काँग्रेस नेते जोतीरादित्य सिंदिया यांच्या गटातील आमदारांनी राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसचे अल्पमतात आलेले सरकार पडले. २०२० साली कमलनाथ यांनी बहुमताच्या चाचणीआधी राजीनामा दिला आणि शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने पुन्हा सत्ता स्थापन केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशच्या २३० विधानसभेच्या जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी निवडणूक जाहीर केली आहे.

छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. २०१८ प्रमाणेच यावेळीदेखील त्यांना विजयाची खात्री वाटते. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. तर राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी निवडणुका होतील. ईशान्य भारतातील मिझोराममध्ये काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. २०१८ साली मिझो नॅशनल फ्रंटने काँग्रेसची दहा वर्षांपासून असलेली सत्ता उलथवून टाकली होती. यावेळी मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे.

हे वाचा >> बिहारप्रमाणेच राजस्थानमध्येही जातीनिहाय सर्व्हे; निवडणुकीच्या घोषणेआधी काँग्रेसचा मोठा डाव

दक्षिणेत असलेल्या तेलंगणामध्ये सध्या भारत राष्ट्र समितीच्या के. चंद्रशेखर राव यांचे सरकार आहे. २०१४ साली तेलंगणाची निर्मिती झाल्यापासून याठिकाणी केसीआर यांच्या पक्षाचीच सत्ता आहे. २०१८ साली झालेल्या शेवटच्या निवडणुकीत केसीआर यांच्या पक्षाला ११९ जागांपैकी ८८ जागांवर विजय मिळाला होता. तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. पाचही राज्यातील निवडणुकांच्या मतमोजणीचा निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी लागणार आहे.

Story img Loader