यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक मतदारसंघांमध्ये रंगतदार लढती पाहायला मिळत आहेत. अशीच एक रंगतदार लढत धाराशिव मतदारसंघात होत आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असून ठाकरे गटाने धाराशिवचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पुन्हा एकदा येथून उमेदवारी दिली आहे. तर महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) आला असून अजित पवार गटाने भाजपा नेते आणि तुळजापूरचे आमदार राणजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना येथून उमेदवारी दिली आहे. उमेदवारीसाठी अर्चना पाटील यांना काही दिवसांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राणा पाटील हे भाजपात असून अर्चना पाटील आता अजित पवार गटात आहेत. पती-पत्नी वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे त्यांच्यावर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी यावरूनच राणा पाटलांचे पुत्र मल्हार पाटलांना टोला लगावला आहे.
राणा पाटलांचे पुत्र मल्हार पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी धाराशिवमधील एका प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून ओमराजेंनी मल्हार पाटलांना टोला लगावला आहे. मल्हार पाटील म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून अजित पवारांच्या सहमतीने २०१९ मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून भाजपात प्रवेश केला. मी हे अतिशय जबाबदारीने सांगतोय की, अजित पवारांनीच आम्हाला आधी पाठवलं आणि मग ते स्वतःदेखील भाजपाबरोबर आले. आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजपा आणि हातात धनुष्यबाण आहे. आम्ही पूर्ण ताकदीने महायुतीचं काम करू.
मल्हार पाटील यांच्या या वक्तव्यावर ओम राजेनिंबाळकर म्हणाले, त्यांनी (मल्हार पाटील) जे काही वक्तव्य केलं त्यात त्यांचा दोष नाही. राणा पाटलांच्या लेकराचा यात दोष नाही. त्यांचे पप्पा भाजपात आहेत, मम्मी राष्ट्रवादीत आहे, यात लेकराचा काय दोष? पप्पा-मम्मी वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे असा केमिकल लोचा होणं स्वाभाविक आहे. पप्पा एका पक्षात, मम्मी दुसऱ्या पक्षात असल्यामुळे त्यांचा असा केमिकल लोचा झाला आहे. त्यामुळे त्यांनी केलेलं भाषण योग्यच म्हणायला हवं.
हे ही वाचा >> “आमदार नसतानाही राणाजगजीतसिंह पाटलांना मंत्री केलं, पण त्यांचे…”, शरद पवार यांचा टोला
ओम राजेनिंबाळकर म्हणाले, मी मल्हार पाटलांना एवढंच सांगेन की, आई वडिलांचा आदर्श घेऊन तुम्ही तुमचं भाषण थोडं वाढवा. तुमची किडणी (मुत्रपिंड) आणि लिव्हर (यकृत) अजून बाकी आहे. त्यामुळे तुम्ही आता म्हणायला हवं की, आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजपा, किडणीत शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसे आहे. शिंदे गट आणि मनसेलाही तुम्ही स्थान द्यायला हवं. म्हणजेच आई-वडिलांप्रमाणे तुम्हीदेखील उद्या कोणत्याही पक्षात जायला रिकामे आहात. तुम्ही कोणाचं कशा पद्धतीने समर्थन करता, काय बोलता, स्वतःच्या स्वार्थासाठी वाट्टेल ते बोलता, कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलायचे आणि वर त्याचं समर्थन करायचं. याचा हिशेब करणं गरजेचं आहे. आहे.