Filing Nomination on Gurupushyamrut Yoga : विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने अर्ज प्रक्रियाही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वच उमेदवारांकडून मुहूर्त साधण्याची धडपड सुरू झाली आहे. दरम्यान, २४ ऑक्टोबरला गुरुपुष्यामृत योग असून या दिवशी अर्ज भरण्याकरता तयारी सुरू झाली आहे. हिंदूस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योग शुभ दिवस मानला जातो. ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग असतो. यादिवशी नवीन वस्तू, वाहन, सोने खरेदी करणं लाभदायक असतं असं हिंदू शास्त्रात सांगितले आहे. महत्त्वाचं म्हणजे वर्षांतून दोन ते चारवेळाच हा योग जुळून येतो. त्यानुसार, गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी हा गुरुपुष्यामृत योग आहे. या योगाचा मुहूर्त साधण्याची धडपड सुरू आहे.
हेही वाचा >> शिंदे-फडणवीस यांची राज ठाकरेंबरोबर खलबते
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी पक्षाचे (शरद पवार) जयंत पाटील यांनी या मुहूर्तदिनीच उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं मान्य केलंय. ते इस्लमापूर येथे प्रचारसभेत बोलत होते. ते म्हणाले, “मला माहीत आहे की आमचे नेते शरद पवार मुहूर्त साधून उमेदवारी अर्ज भरण्यावर विश्वास ठेवत नाही. पण मी प्रचारसभांमध्येही व्यस्त आहे. त्यामुळे २४ ऑक्टोबरला मी अर्ज भरणार आहे.”
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार राजन साळवी म्हणाले, “आम्हाला पक्षाने उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले आहे. मी २४ ऑक्टोबरला अर्ज भरणार आहे. ” तसंच, याचदिवशी आदित्य ठाकरेही अर्ज भरण्याची शक्यता आहे. कसबा पेठेतील भाजपाचे संभाव्य उमेदवार हेमंत रासने म्हणाले, “मी ही याच मुहुर्तावर अर्ज भरणार आहे. माझ्या नावाची पक्षाकडून अधिकृत घोषणा होण्याची मी वाट पाहतोय.”
“जागा वाटपाबाबत मला फार अडचण वाटत नाही. एकत्र बसून निर्णय घेतला जात आहोत. ज्या जागा शिल्लक आहेत तिथे आपला उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचा आहे, असं प्रत्येक पक्षाला वाटत असतं. पण हा चर्चेचा विषय आहे. आता आघाडीची बैठक आहे. उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे, शरद पवारांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. २४ तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे. सर्व पक्षातील उमेदवारांना वाटतंय की त्याच दिवशी अर्ज भरावा”, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
हेही वाचा >> Yogi Slogans : “बटेंगे तो कटेंगे”, मुंबईत योगींच्या घोषवाक्यांचे पोस्टर्स; भाजपाची नेमकी योजना काय?
उमेदवारी जाहीर होण्याची प्रतिक्षा
दरम्यान आतापर्यंत फक्त भारतीय जनता पक्षाने ९९ जणांची यादी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने अधिकृतरित्या दोघांची नावे जाहीर केली आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीतील इतर मित्र पक्षांची यादी अद्याप येणं बाकी आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृत योग साधण्यासाठी इच्छूक उमेदवार यादींची वाट पाहत आहेत. ही यादी जाहीर होताच, २४ ऑक्टोबर रोजीचा मुहुर्त साधण्याची शक्यता आहे.