5 State Assembly Election 2023 Exit Polls Live Streaming: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाच राज्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांची धामधूम पाहायला मिळाली. आज तेलंगणामध्ये मतदान झाल्यानंतर आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती Exit Polls ची. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पाच राज्यांच्या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणूनच पाहिलं जात आहे. विशेषत: राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपा सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी उत्सुक असताना मध्य प्रदेशमध्ये पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असेल. त्यामुळे या निवडणुकांचे ३ डिसेंबर रोजी निकाल लागणार असले, तरी त्या निकालांचा कल नेमका काय असेल? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानमध्ये आजपर्यंत एकच सरकार सलग १० वर्षं राहिलेलं नाही. त्यामुळे भाजपाला यंदा राजस्थानमध्ये आशा असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये २०२०मध्ये सत्तानाट्यात सत्ता गमावल्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी उत्सुक आहे. छत्तीसगडमध्ये बघेल सरकारनं ग्रामीण भागात, विशेषत: आदिवासी व शेतकरी समाजासाठी केलेल्या कामांचा काँग्रेसला फायदा होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तिकडे तेलंगणामध्ये बीआरएसच्या नव्या मॉडेलला जनता पुन्हा कौल देईल की काँग्रेस मुसंडी मारेल, याकडेही राजकीय जाणकारांचं लक्ष राहील. मिझोरममध्येही मिझो नॅशनल फ्रंटला काँग्रेस व झोरम पीपल्स मूव्हमेंट यांच्याकडून टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

या निवडणुकांच्या निमित्ताने देशातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष काँग्रेस व भारतीय जनता पार्टी आपापली ताकद आजमावून पाहात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांप्रमाणेच त्यांच्यासमवेत आघाडीत असणारे इतर पक्ष व राज्यांमधील प्रादेशिक पक्षांचेही या निवडणुकांच्या निकालाकडे डोळे लागले आहेत. यातील निकालांनुसार सर्व पक्ष पुन्हा एकदा आपल्या निवडणूक व प्रचार धोरणाचा पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.

हैदराबादचे नाव भाग्यनगर करण्याची मागणी का केली जातेय? भाजपाचा उद्देश काय?

Exit Polls कधी येणार?

सामान्यपणे मतदान पार पडल्यानंतर त्या ठिकाणचे विविध संस्थांकडून करण्यात आलेले एक्झिट पोल जाहीर केले जातात. यंदा मात्र पाच राज्यांमध्ये मतदान झालं. त्यामुळे या सगळ्या ठिकाणचे एक्झिट पोल तेलंगणातील मतदानाच्या दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी साधारणपणे ५ किंवा ६ वाजेपासून यायला सुरुवात होईल.

कोण तयार करतं हे Exit Polls?

एक्झिट पोल सरकारकडून किंवा कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडून तयार केले जात नाहीत. वेगवेगळ्या खासगी संस्था हे पोल तयार करतात. यात एबीपी-सीएसडीसी, टाईम्स नाऊ-सीएनएक्स, सी-वोटर रिपब्लिक, इंडिया टीव्ही, इंडिया टुडे-एक्सिस, टुडे चाणक्य अशा वेगवेगळ्या एक्झिट पोल्सच्या अर्थात मतदानोत्तर चाचणीच्या माध्यमातून मतदारांचा कल नेमका कुठल्या बाजूला असेल, याचा अंदाज बांधला जातो.

कसे तयार केले जातात एक्झिट पोल?

एक्झिट पोल किंवा मतदानोत्तर चाचण्या या प्रामुख्याने मतदार मतदान देऊन केंद्रातून बाहेर आल्यानंतर त्याच्याकडून घेतलेल्या उत्तरांच्या माध्यमातून तयार केल्या जातात. मतदान करून आलेल्या मतदारांच्या सर्वेक्षणातून प्रातिनिधिक प्रमाणात नमुना उत्तरं गोळा केली जातात. त्याआधारे कोणत्या मतदारसंघात आणि त्याआधारे कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात? याचा अंदाज वर्तवला जातो. प्रत्येक वेळी हे कल अचूकच असतात असा अनुभव नसला, तरी त्याद्वारे निकालांमध्ये काय चित्र असू शकेल? याचा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत असतात.

कुठे पाहाल एक्झिट पोल?

एक्झिट पोल पाहण्यासाठी त्या त्या संस्थेच्या संकेतस्थळाचा आधार घेता येईल. शिवाय लोकसत्ता डॉट कॉमवरही या सर्व एक्झिट पोलचं कव्हरेज वाचकांना पाहाता येईल. त्याचबरोबर विविध मराठी, हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्या, संकेतस्थळे या एक्झिट पोलचे आकडे सादर करत असतात.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five state election results exit polls 2023 prediction on bjp congress brs win after telangana voting pmw
Show comments