लोकसभा निवडणूक प्रचारसभांचा धडाका मागच्या महिन्यापासून सुरु झाला आहे. जो १८ मे पर्यंत चालणार आहे. कारण महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघांमध्ये पार पडल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत त्यांचा मुक्काम हलवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १०० प्रचारसभांचा रेकॉर्ड पूर्ण केला आहे. तरीही ते बीडला गेले नाहीत. त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.
मराठा बांधवांचा फडणवीसांवर रोष का?
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सगे सोयऱ्यांच्या अमलबजावणीसह आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या उपोषण आंदोलनाच्या दरम्यान त्यांची प्रकृती दोन वेळा खालावली होती. तसंच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोपही केले होते. तसंच आंदोलनातून उठून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनेही निघाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टरांकडून विष देण्याचा प्रयत्न केला असाही आरोप मनोज जरांगेंनी केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात रोष निर्माण झाल्याची भावना होती. देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये प्रचाराला जाणं याच कारणासाठी टाळलं का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचराण्यात आला होता त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीस हुकूमशहा” जरांगे पाटील यांचं विधान; म्हणाले, “गृहमंत्र्यांचा माझ्यावर आणि माझ्या समाजावर…”
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“मराठवाड्यातल्या ८ पैकी ७ मतदारसंघांमध्ये मी प्रचारसभा घेतली आहे. फक्त बीड लोकसभा निवडणुकीला मी जाऊ शकलो नाही मला त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सभेला जायचं होतं. नरेंद्र मोदींच्या दोन सभा त्यादिवशी होत्या. त्यातल्या एका सभेला मला जायचं होतं त्यामुळे मी बीडला जाऊ शकलो नाही. मराठवाड्यातल्या बीड वगळता इतर मतदारसंघांमध्ये मी तीन ते चार सभा घेतल्या ” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
हा प्रकर दुर्दैवी
यापुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जातीय ध्रुवीकरण पाहण्यास मिळालं. मात्र हा प्रकार दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या सोशल फॅब्रिकला धक्का देणारं ध्रुवीकरण आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा विचार केला पाहिजे अशा प्रकारे दुफळी निर्माण होणं, दोन समाज एकमेकांसमोर येणं हे काही चांगलं नाही. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.