उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद बोलावली होती. कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबत या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परिस्थितीत निवडणूक आयोगाने काही कठोर नियम जाहीर केले आहेत. दरम्यान, एकूण १८.३ कोटी मतदार या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पाच राज्यांमध्ये सात टप्प्यांत निवडणुका होणार असून १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे. गेल्या आठवड्यात, पाच राज्यांमधील सध्याच्या कोविड परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी निवडणूक मंडळाने आरोग्य मंत्रालयासोबत बैठक घेतली होती. या बैठकांमध्ये करोनाच्या काळात होणाऱ्या या निवडणुका सुरक्षितपणे कशा पार पाडता येतील यावर चर्चा करण्यात आली. आरोग्य मंत्रालयाने देशभरातील लसीकरणाच्या स्थितीचा अहवाल सादर केला होता. अनेक राजकीय पक्षांनी आधीच राजकीय रॅली रद्द करण्याची घोषणा केली आहे आणि करोनाची वाढती प्रकरणे पाहता डिजिटल मोहिमेवर अधिक भर देत आहेत.
या निवडणुकीत १८.३४ कोटी मतदार सहभागी होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. प्रत्येक विधानसभेतील एक मतदान केंद्र संपूर्णपणे महिलांद्वारे चालवले जाईल. महिला सक्षमीकरणासाठी हे अधिक चांगले होईल. दिव्यांगांसाठी व्हील चेअरचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, कोविड बाधित व्यक्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. बॅलेट पेपरद्वारे मतदानाची व्यवस्था असेल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी सांगितले की मतदान केंद्रांची संख्या २,१५,३६८ आहे. २०१७च्या विधानसभा निवडणुकीपासून मतदान केंद्रांची संख्या १६ टक्क्यांनी वाढली आहे. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये १८.३४ कोटी मतदार या निवडणुकीत सहभागी होतील, त्यापैकी ८.५५ कोटी महिला मतदार आहेत.
दरम्यान, सर्वाधिक २९ टक्के उत्तर प्रदेशात, गोव्यात २४ टक्के, मणिपूरमध्ये १९ टक्के, उत्तराखंड १८ टक्के तर पंजाबमध्ये १० टक्के महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. २४.९ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामध्ये ११.४ लाख महिला मतदार आहेत. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १२५० मतदार असतील.