गंगाखेड विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला भाजपाच्या नेत्यांचा विरोध; रत्नाकर गुट्टेंना पुन्हा समर्थन मिळणार?

गंगाखेड हा भाग हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, त्यानंतर भाजपाने या ठिकाणी आपली पकड मजबूत केली.

gangakhed assembly constituency
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष आणि भाजपाची युती असली तरी आता राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडूनच विरोध केला जातो आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय आहे? २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचं चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?

गंगाखेड हा भाग हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, त्यानंतर भाजपाने या ठिकाणी आपली पकड मजबूत केली. मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार झालेल्या फेररचनेनुसार या मतदारसंघात गंगाखेड, पालम आणि पुर्णा या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर झालेल्या तिन्ही निवडणुकीत तीन वेगळ्या पक्षाच्या आमदारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलं. २००९ अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट यांनी विजय मिळवला. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुसूदन केंद्रे आणि २०१९ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या रत्नाकर गुट्टे यांनी विजय मिळवला.

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे संजय शिरसाट गड राखणार? कशी आहेत राजकीय समीकरणं?

२०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपाने आपला मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडला होता. राष्ट्रीय समाज पक्षाने रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या विरोधात अविभाजीत शिवसेनेने विशाल कदम यांना, अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने मधुसूदन केंद्रे यांना रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत रत्नाकर गुट्टे यांचा १८ हजार ५८ मतांनी विजय झाला होता. गुट्टे यांना एकूण ८१ हजार १६९ मते, विशाल कदम यांना ६३ हजार १११ मते, तर मधुसूदन केंद्रे यांना एकूण ८ हजार २०४ मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार सीताराम घांडट ५२ हजार २४७ मतांसह तिसऱ्या स्थानी होते. तर वंजित बहुजन आघाडीच्या करुणाबाई खुंदगीर यांना २८ हजार ८३७ मते मिळाली होती.

हेही वाचा – सिल्लोड विधानसभा मतदारसंघ : अब्दुल सत्तार विजयाचा चौकार मारणार? काय आहेत त्यांच्यापुढील आव्हानं?

या मतदारसंघाची सद्यस्थिती काय?

हा मतदारसंघ सध्या भाजपाचा मित्र असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाकडे आहे. पण ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही मित्र पक्षातील बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे काम आम्ही करणार नाही अन्यथा आम्हाला पक्षातून मोकळे करा, अशी भूमिका या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. मुळात भाजपाच्या बहुतांश स्थानिक पदाधिकाऱ्यांचे गुट्टे यांच्याशी सख्य नाही. त्यामुळे जागावाटपावरून गंगाखेड विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही पक्ष मात्र आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या जागेसाठी भाजपाकडून जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय महाविकास आघाडीकडून ही जागा नक्की कोणाच्या वाट्याला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( शरद पवार गट) दावा करण्यात आल्याची सुत्रांनी माहिती आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gangakhed assembly constituency ratnakar gutte bjp politcal history spb

First published on: 20-10-2024 at 18:10 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या