गॅरी कास्पारोव्ह हे नाव बुद्धिबळप्रेमीच नव्हे, तर जगभरातल्या लोकांना परिचित आहे. सर्वकालीक महान बुद्धिबळपटूंमध्ये गॅरी कास्पारोव्ह यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. रशियामध्ये अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेतल्यामुळे अलिकडच्या काळात गॅरी कास्पारोव्ह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुतिन सरकारने तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केलं आहे. मात्र, आता कास्पारोव्ह यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी एका एक्स (ट्विटर) यूजरच्या पोस्टवर उत्तर देताना रायबरेली लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राहुल गांधींचा रायबरेलीतून उमेदवारी अर्ज
अमेठी व रायबरेली हे काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ मानले जातात. मात्र, अमेठीतून स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केल्यापासून हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. यंदाही राहुल गांधींना पराभूत करण्याचा निर्धार स्मृती इराणींनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी यावेळी अमेठीऐवजी रायबरेलीतून, अर्थात सोनिया गांधींच्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याशिवाय, वायनाडमधूनही त्यांनी अर्ज दाखल केला आहे. यावरून भाजपाकडून राहुल गांधींनी लक्ष्य केलं जात असताना महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह यांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे टिप्पणी केल्याचं बोललं जात आहे.
काय म्हणाले गॅरी कास्पारोव्ह?
एका युजरनं केलेल्या एक्सवर केलेल्या पोस्टनंतर कास्पारोव्ह यांनी दिलेल्या उत्तरात रायबरेली लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केला आहे. “मला अगदी सुटका झाल्यासारखं वाटतंय की गॅरी कास्पारोव्ह आणि विश्वनाथन आनंद हे लवकर निवृत्त झाले आणि त्यांना आमच्या काळातील सर्वात महान बुद्धिबळपटूचा सामना करावा लागला नाही”, अशी पोस्ट एका युजरनं केली होती. त्यावर गॅरी कास्पारोव्ह यांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे.
“इतिहास असं सांगतो की तुम्हाला जर सर्वोच्च स्थानी पोहोचायचं असेल, तर तुम्हाला रायबरेलीतून जिंकावं लागतं”, अशी पोस्ट कास्पारोव्ह यांनी उत्तरादाखल केली आहे. राहुल गांधींनी रायबरेलीतूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासंदर्भात त्यांच्यावर भाजपाकडून खोचक टीका केली जात आहे. आधीच्या यूजरनं त्यांच्याबाबतच खोचक पोस्ट केली असून त्यावरच कास्पारोव्ह यांनी राहुल गांधींच्या संदर्भात उत्तर दिल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसचं ठरलं! रायबरेलीतून राहुल गांधी, तर अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी
काही तासांत आणखी एक पोस्ट, आणखी एक भूमिका!
दरम्यान, या उत्तरानंतर काही तासांत गॅरी कास्पारोव्ह यांनी आपल्याच पोस्टवर पुन्हा रिप्लाय केला आहे. त्यात मात्र त्यांनी खोचक शब्दांत आधीच्या उत्तराला ‘विनोद’ म्हटल्यामुळे त्यांच्या या पोस्टचीही चर्चा होऊ लागली आहे. “मला आशा आहे की माझा हा छोटासा विनोद भारतातील राजकारणावरील तज्ज्ञ भूमिका म्हणून मान्य होणार नाही. पण मला याआधीही ‘एक हजारो डोळ्यांनी सारंकाही पाहणारा दानव’ असं म्हटलं गेलंय. त्यावरून सांगतो, माझ्या आवडत्या खेळात जर एखादा राजकारणी वरवरच्या चाली खेळत असेल तर ते माझ्या नजरेतून सुटू शकत नाही”, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
राहुल गांधी आणि गॅरी कास्पारोव्ह!
राहुल गांधींनी अनेक प्रसंगी गॅरी कास्पारोव्ह यांच्या बुद्धिबळ कौशल्यांचे आपण चाहते असल्याचं म्हटलं आहे. “मला कास्पारोव्ह आवडतात. ते विरोधी खेळाडूवर खूप मानसिक दबाव निर्माण करतात. चाकोरीबाहेरच्या चालींचा विचार करणारे ते एक महान खेळाडू आहेत”, असं राहुल गांधी एका व्हिडीओमध्ये म्हणाले होते.