Gayatri Shingne: ‘पवार साहेब, हेच का आमच्या निष्ठेचं फळ’, काकाच्या पक्षप्रवेशानंतर पुतणीचा अपक्ष लढण्याचा निर्धार; शरद पवार काय करणार?

Who is Gayatri Shingne: बुलढाण्यातील सिंदखेडराजा विधानसभेचे आमदार, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांच्या पक्षात घरवापसी केल्यानंतर त्यांची पुतणी गायत्री शिंगणे नाराज झाली असून तिने अपक्ष निवडणूक लढविण्याचा इशारा दिला आहे.

Gayatri Shingne on Rajendra Shingane join NCPSP
कोण आहेत गायत्री शिंगणे? काका-पुतण्यानंतर आता राज्याला काका-पुतणी संघर्ष पाहायला मिळणार? (Photo – Loksatta Graphics)

Gayatri Shingne vs Rajendra Shingne: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय उलथापालथी होत आहेत. जिंकण्याची खात्री नसणे आणि उमेदवारी डावलली जाण्याच्या शक्यतेमुळे अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यंदाची विधानसभा निवडणूक घड्याळ की तुतारी, यापैकी कोणत्या चिन्हावर लढवायची याबाबत शिंगणे यांनी संभ्रम निर्माण केला होता. पण अखेर त्यांनी शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. शिंगणे यांच्या प्रवेशामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघाचे चित्र बदलले आहे. महायुतीकडून याठिकाणी कुणाला उमेदवारी मिळणार? हा प्रश्न उपस्थित झाला असून राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणेने बंडाचे निशाण फडकवत थेट शरद पवारांनाच सवाल विचारला आहे.

तब्बल पाचवेळा सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदारपद भूषवणारे शिंगणे यांनी मागील महिनाभरापासून मतदारसंघातील राजकीय संभ्रम कायम ठेवला. तांत्रिकदृष्ट्या ते अजित पवार यांच्यासोबत होते, मात्र मनाने शरद पवारांसोबत! यामुळे, महायुतीकडून लढणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार? याबद्दल संभ्रम कायम ठेवण्याचे त्यांचे डावपेच यशस्वी ठरले. आता त्यांनी ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिंगणे यांचा पक्षप्रवेश पार पडला.

मात्र त्यांचा हा पक्षप्रवेश त्यांची पुतणी गायत्री शिंगणेला रुचलेला नाही. मागील अनेक महिन्यांपासून त्या मतदारसंघ पिंजून काढत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे यांनी कोणत्याही परिस्थितीत सिंदखेड राजामधून लढण्याचा निर्धार बोलून दाखविला आहे.

‘हेच का आमच्या निष्ठेच फळ’

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी थेट शरद पवारांनाच रोखठोक प्रश्न विचारले. त्या म्हणाल्या, “पक्ष फुटला, लोकसभेला सर्व निष्ठावंत कामाला लागले गद्दाराना माफी नाही असे मा.पवार साहेब व इतर सर्व वरिष्ठ नेते मंडळी बोलली. आमच्या सारखे सामान्य कार्यकर्ते गावा-गावात गेले. पक्ष-चिन्हं पोहचवला बदल्यात काय भेटलं तर गद्दाराना पक्ष प्रवेश मा. पवार साहेब हेच का आमच्या निष्ठेच फळ आता महाराष्ट्रामधील इतर कार्यकर्तानी आजचा प्रवेश पाहुन काय प्रेरणा घ्यावी गद्दारी केली तरी माफी मिळते??”

काका विरुद्ध पुतणी संघर्ष होणार?

डॉ. राजेंद्र शिगणे यांची उच्चशिक्षित पुतणी गायत्री शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात सामील होत काकांना आव्हान देण्याचे प्रयत्न केले होते. विकासावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली, आंदोलने केली. त्यामुळे काका विरुद्ध पुतणी, अशी लढत होण्याची चिन्हे तयार झाली. मात्र शिंगणेच्या ‘घरवापसी’मुळे आता त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे गायत्री शिंगणे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारीही दर्शविली आहे.

शरद पवार काय करणार?

पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना पुन्हा प्रवेश देणार नाही. त्यापेक्षा नव्या दमाच्या तरुणांना संधी देऊ, असे शरद पवार वारंवार सांगत होते. मात्र लोकसभा निवडणुकीत निलेश लंके आणि आता राजेंद्र शिंगणे यांना पुन्हा प्रवेश दिला आहे. शिंगणे यांना सिंदखेडराजा विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे गायत्री शिंगणे यांच्या इशाऱ्यानंतर शरद पवार काय करणार? याकडे लक्ष लागले आहे. जिंकण्याची खात्री असल्यामुळे जुन्याच नेत्यांना पुन्हा संधी देऊन तरुणांचा हिरमोड करणार का? असाही प्रश्न आता यानिमित्ताने विचारला जात आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gayatri shingne upset after rajendra shingne joins ncp sharad pawar faction announce independent candidature for sindkhed raja assembly election kvg

First published on: 20-10-2024 at 11:00 IST

संबंधित बातम्या